मेळघाटातील आदिवासी पाड्यांमध्ये स्मशानशांतता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 05:00 AM2020-04-24T05:00:00+5:302020-04-24T05:01:47+5:30
गावात नवीन व्यक्ती शिरू नये, यासाठी गावाच्या प्रवेशद्वारावर काही युवकांनी संरक्षण पथक स्थापन केले आहेत. गावबंदी करीत रस्त्यावर दगड-धोंडे, मोठी लाकडे लावण्यात आली असल्याचे चित्र आहे. आदिवासींचा सर्वात मोठा सण होळी आहे. यादरम्यान फगवा मागण्यासाठी गावबंदी केली जाते. जांगडी (शहरी माणूस) ला फगवा मागितला जातो तेव्हा अशी लाकडे, दगड लावून पाच दिवस गावप्रवेशास बंदी केला जातो.
नरेंद्र जावरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : ‘साहब, शेर से डर नही लगता; खाकीवर्दी से लगता है’ अशी मेळघाटातील प्रचलित म्हण आहे. वाघाशी दोन हात करणारा आदिवासी वनकर्मचाऱ्यांना फार घाबरतो. मात्र, देशात कोरोनामुळे लॉक डाऊन झाल्यानंतर सर्व काही जागेवर थांबले आहे. अशातच गावशिवारावर एखाद्या वाहनाचा आवाज येताच घराबाहेर बसलेले आदिवासी क्षणात बेपत्ता होतात. कोरोनाची दहशत अतिदुर्गम हतरू, भांडुमपासून सर्वत्र पसरली आहे.
गावात नवीन व्यक्ती शिरू नये, यासाठी गावाच्या प्रवेशद्वारावर काही युवकांनी संरक्षण पथक स्थापन केले आहेत. गावबंदी करीत रस्त्यावर दगड-धोंडे, मोठी लाकडे लावण्यात आली असल्याचे चित्र आहे. आदिवासींचा सर्वात मोठा सण होळी आहे. यादरम्यान फगवा मागण्यासाठी गावबंदी केली जाते. जांगडी (शहरी माणूस) ला फगवा मागितला जातो तेव्हा अशी लाकडे, दगड लावून पाच दिवस गावप्रवेशास बंदी केला जातो. कोरोनामुळे दुसऱ्यांदा हे चित्र दिसून आले.सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या मेळघाटातील पाड्यांमधून रोजगारासाठी शेकडो किलोमीटर अंतरावरील बड्या शहरांमध्ये स्थलांतरित झालेले आदिवासी बांधव लॉकडाऊनपूर्वी मोठ्या प्रमाणात परतले आहेत. काही जेथे अडकले, तेथेच त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
मेळघाटात मोठ्या प्रमाणात कोरडवाहू शेती असल्याने पावसाळ्यात सोयाबीन पिकानंतर आदिवासी रोजगारागाठी बाहेर पडतात. २३ मार्च रोजी लॉक डाऊन झाल्यामुळे सर्वच घरात थांबले आहेत.
मेळघाटचा बराचसा भाग मध्यप्रदेशच्या सीमारेषेवर आहे. बैतूल जिल्ह्यातील भैसदेही येथे एक युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर चिखलदरा तालुक्यातील सर्व रस्ते सील करण्यात आले आहेत. यानंतर या गावांमध्ये आदिवासी युवकांची सतर्कता वाढली आहे. त्या परिसरातून इकडे येण्यावर पूर्णत: बंदी असल्याचे चित्र दिसून आले.
वाहनाचा आवाज येताच पोबारा
सहकाºयांशी गप्पा मारत बसणारे गावातील आदिवासी एखाद्या वाहनाचा आवाज आला की, घरात दडून बसतात. धान्यवाटप करण्यासाठी आवाज दिला, तरच बाहेर पडून ते घेतले जाते. दैनंदिन कामाव्यतिरिक्त काही जण शेतीची कामे करीत असून, ज्यांच्या कोरडवाहू शेतात मोहाची झाडे आहेत, असे आदिवासी मोहफुले वेचताना दिसतात. उर्वरित मात्र घरात बसून कोरोना नियमांचे पालन करीत असल्याचे चित्र काटकुंभ, जारिदा, दहेन्द्री, हतरू, रायपूर या परिसरात दिसून आले.