दर्यापुरातील श्री हनुमान व्यायाम शाळेची शतकोत्तर वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:11 AM2021-04-13T04:11:46+5:302021-04-13T04:11:46+5:30
फोटो - स्वातंत्र्यलढ्याला बळ देण्याची प्रेरणा, सोहळ्याला कोरोनाची बाधा दर्यापूर : शहरातील भवानी वेसेतील श्री हनुमान व्यायामशाळा यंदा शंभर ...
फोटो -
स्वातंत्र्यलढ्याला बळ देण्याची प्रेरणा, सोहळ्याला कोरोनाची बाधा
दर्यापूर : शहरातील भवानी वेसेतील श्री हनुमान व्यायामशाळा यंदा शंभर वर्षे पूर्ण करून शतकोत्तर वाटचाल करीत आहे. स्वातंत्र्यलढ्यासाठी तरुणांची फळी तयार करण्याची प्रेरणा या व्यायामशाळेच्या उभारणीमागे होती. यानिमित्त व्यायामशाळेकडून आयोजित होणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या तयारीला कोरोना संक्रमणामुळे ‘ब्रेक’ लागले आहेत. कोरोनायोद्धा म्हणून लढण्यास ते पुढे आले आहेत.
दर्यापूर व परिसरातील स्वातंत्र्यसैनिकांनी एकत्र येत सन १९२१ साली श्री हनुमान व्यायामशाळेचा पाया रचला. इंग्रजांच्या राजवटीत स्थापन झालेल्या या व्यायामशाळेचा इतिहास दर्यापूरनगरीत सर्वश्रुत आहे. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीच्या ध्येयासाठी अनेक युवकांना एकत्र येण्याची साद घातली होती. त्यासाठी व्यायामशाळेयासारखे दुसरे उपयुक्त साधन नाही, हे ओळखून भगवानसिंह ठाकूर, महादेवराव मुर्डीव, दत्तात्रय गोविंद चिकटे, जनार्दनपंत देशपांडे, नाना उपासने यांच्यासह तत्कालीन युवकांनी श्री हनुमान व्यायामशाळेच्या माध्यमातून बल उपासना तथा राष्ट्रभक्तीचे धडे युवकांना दिले. दर्यापूरमधील एडवर्ड हायस्कूल या इंग्रजांच्या शाळेवर हल्ला करून ‘वंदे मातरम’ व ‘भारत माता की जय’ असे नारे देत याच व्यायामशाळेच्या युवकांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. यामुळे व्यायामशाळेच्या अनेक सदस्यांना इंग्रजांनी अटक केली होती. अनेक जण भूमिगतसुद्धा झाले होते. सर्वधर्म समभाव तथा भेदाभेदरहित शिकवण या व्यायामशाळेच्या माध्यमातून युवकांना आजही दिली जाते. शंभर वर्षे पूर्ण करणारी जिल्ह्यातील ही व्यायामशाळा एकमेव असावी, असे जाणकारांचे मत आहे.
कोरोनाने कार्यक्रमांचे आयोजन होत नसले तरी कोरोनायोद्धा म्हणून या व्यायाम शाळेच्या सदस्यांनी सामाजिक कार्याची तयारी दर्शविली आहे. स्थानिक प्रशासनाला तशी विनंती केली आहे.
-------------
लोकवर्गणीवर कार्यक्रमांची मदार
लोकमान्य टिळकांच्या आवाहनावर सुरू केलेल्या गणेशोत्सवसारख्या कार्यक्रमांतून योग, व्यायाम शिबिर, राष्ट्रभक्तीचे धडे, बौद्धिक आदी कार्यक्रम या शाळेच्या माध्यमातून अव्याहत सुरू आहेत. शासनाचे कुठलेही अनुदान न घेता, लोकवर्गणीवर या कार्यक्रमांची मदार असते.
---------------
सर्वधर्मीयांचा गणेशोत्सव
सर्व जातींनी मिळून गणेशोत्सव साजरा करण्याची मंडळाची परंपरा आजही कायम आहे. बुद्ध, मुस्लिम, जैन, ख्रिस्ती धर्मातील लोकांना गणेशोत्सवात मानाचे स्थान देण्यात येते. विविध धर्मांतील लोकांनी या उत्सवात अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. यामुळे येथील उत्सव हे धार्मिक न राहता सर्वधर्मीयांचे होऊन जातात. या कार्यासाठी दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाने या व्यायामशाळेला गौरविले आहे.
-------------
मंडळाच्या जडणघडणीत यांचे योगदान
तत्कालीन अध्यक्ष दिवंगत अशोकसिंह गहरवार, रमेश नाकट, विठ्ठल खंडारे, राजेंद्र बाळापुरे, विजयसिंह गहरवार, अशोक देशमुख, सुरेश होले आदी मंडळींनी या व्यायामशाळेच्या जडणघडणीत मोठे योगदान केले. आजही येथे सर्वधर्म, समाज, जाती, एकत्र येत नव्या पिढीला राष्ट्र भक्त घडविण्यासाठी कार्य करतात.
--------------------