‘केंद्राचा पुन्हा वांधा, खरेदी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2017 12:14 AM2017-06-02T00:14:29+5:302017-06-02T00:14:29+5:30
बाजार हस्तक्षेप योजनेची मुदत संपली तरी तूर खरेदी करण्यात येईल, असे आस्वासन सहकार मंत्र्यांनी दिले असले तरी
६.१३ लाख क्विंटल तूर खरेदी बाकी : मुदतवाढीसाठी शासनादेशाची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बाजार हस्तक्षेप योजनेची मुदत संपली तरी तूर खरेदी करण्यात येईल, असे आस्वासन सहकार मंत्र्यांनी दिले असले तरी प्रत्यक्षात आदेश नसल्याने जिल्ह्यातील सर्वच १२ केंद्रांवरील तूर खरेदी गुरुवारी बंद राहिली. त्यामुळे या सर्व केंद्रांवर व शेतकऱ्यांच्या घरी किमान सहा लाख १३ हजार क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत पडून आहे. सध्या मान्सूनपूर्व पाऊस येत असल्याने शेतकऱ्यांच्या समोर नवे संकट उभे ठाकले आहे.
जिल्ह्यासह राज्यात १० मे पासून केंद्राव्दारा पीएसएस योजनेंतर्गत तुरीची खरेदी करण्यात आली. मात्र ही खरेदी २६ मे रोजी संपल्याने राज्य शासनाच्यावतीने बाजार हस्तक्षेप योजना सुरू करण्यात आली. या योजनेची मुदत ३१ मे रोजी संपली. राज्य शासनाचे वतीने पुन्हा केंद्राला विनंती करण्यात आली. राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी तूर खरेदी सुरूच राहनार असल्याचे बुधवारी स्पष्ट केले होते. मात्र खरेदीदार यंत्रनेला गुरुवारी शासनाचे आदेश प्राप्त नसल्याने त्यांनी खरेदी केली नाही. शेतकऱ्यांना मात्र याबाबत कोणतीही माहिती नसल्याने शेतकऱ्यांनी केंद्रावर गर्दी केली, व तुरीची खरेदी होणार नाही, याची माहीती होताच शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला.
बुधवारी खरेदीदार यंत्रणाव्दारा सर्व केंद्रांवर पडून असलेल्या तुरीचे पंचनामे करण्यात आले. त्यानुसार सर्व केंद्रांवर ३१ मे रोजी २४ हजार ६९० शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले होते. या शेतकऱ्यांची पाच लाख ३१ हजार २४३ व्किंटल तूर मोजमाप अद्याप व्हायचे आहे.यामध्ये अचलपूर केंद्रावर २,२७६ शेतकऱ्यांची ४७,६२६ क्विंटल, अमरावती केंद्रावर ४३९४ शेतकऱ्यांची १,२३,४५४, अंजनगाव सुर्जी केंद्रावर २,५२५ शेतकऱ्यांची ४२,१६७, चांदूरबाजार केंद्रावर १,५४६ शेतकऱ्यांची २९,३५० चांदूररेल्वे केंद्रावर १,८५८,शेतकऱ्यांची ३६,५१५, दर्यापूर केंद्रावर ३,३५३ शेतकऱ्यांची ८७,२८६, धामणगाव केंद्रावर १,७९२ शेतकऱ्यांची ३१,७००, धारणी केंद्रावर १२७ शेतकऱ्यांची १,६३० मोर्शी केंद्रावर २,२२५ शेतकऱ्यांची ४७,८९२, नांदगाव केंद्रावर २,४४७ शेतकऱ्यांची ४७,९१२ तिवसा केंद्रावर १,१९४ शेतकऱ्यांची २४,७०० व वरूड केंद्रावर ९५३ शेतकऱ्यांची १४,९०८ क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे.