केंद्र बंद, दोन लाख पोते यार्डात
By admin | Published: April 23, 2017 12:15 AM2017-04-23T00:15:55+5:302017-04-23T00:15:55+5:30
जिल्ह्यातील दहा शासकीय तूर खरेदी केंद्र शनिवारपासून बंद होणार आहेत. या केंद्रावर अद्याप दोन लाख
राज्य शासनाचा केंद्राकडे प्रस्ताव : शासकीय तूर खरेदी केंद्रांना मुदतवाढ केव्हा ?
अमरावती : जिल्ह्यातील दहा शासकीय तूर खरेदी केंद्र शनिवारपासून बंद होणार आहेत. या केंद्रावर अद्याप दोन लाख पोते तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. या केंद्रांना मुदतवाढ मिळावी, असा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्राकडे पाठविला असला तरी अद्याप मुदतवाढ नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
नाफेडद्वारा चांदूररेल्वे, नांदगाव खंडेश्वर, मोर्शी एफसीएद्वारा अमरावती, धामणगाव रेल्वे व डीएमओद्वारा अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार, दर्यापूर व वरुड येथील शासकीय तूर खरेदी केंद्रांना १७ ते २२ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ शनिवारी संपत आहे. मात्र, अद्यापपावेतो मुदतवाढ किंवा अन्य आदेश कुठल्याही केंद्रांना आले नसल्याने केंद्रावर मोजणीच्या प्रतीक्षेत असलेली दोन लाख पोते तूर केंद्राद्वारे मोजली जाणार किंवा नाही, याविषयी संभ्रम कायम आहे.
नाफेडच्या राज्य संचालक विनाकुमारी यांनी अमरावती, अकोला व बुलडाणा या तीन जिल्ह्यांचा दौरा करून नाफेडच्या केंद्राची पाहणी केली. यासर्व ठिकाणी उपस्थित शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना त्यांना करावा लागला. जिल्ह्यातील तीन केंद्रांना त्यांनी भेटी देऊन पाहणी केली. त्यांच्या अहवालानुसार राज्य शासनाने केंद्राकडे मुदतवाढीचा प्रस्ताव पाठविल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनीदेखील १५ मेपर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव पणनच्या अप्पर मुख्य सचिवांकडे १९ एप्रिल रोजी पाठविला. या सर्व पार्श्वभूमिवर केंद्रांना मुदतवाढ मिळणार की तुरीचे पोते वापस न्यावे लागणार, या संभ्रमात शेतकरी आहेत.
अमरावती, दर्यापूरमध्ये सर्वाधिक पोते पडून
सद्यस्थितीत दोन लाख पोते तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. यामध्ये अमरावती ४० हजार, दर्यापूर ३८ हजार, चांदूररेल्वे ३ हजार, नांदगाव ६ हजार, मोर्शी १३ हजार, धामणगाव १५ हजार, अचलपूर २८ हजार, अंजनगाव २१ हजार, चांदूरबाजार १४ हजार व वरुड येथे २२ हजार पोते तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, केंद्र बंद होत असल्याने तुरीची मोजणी करणार की वापस न्यावी लागणार हा संभ्रम कायम आहे.