लसीकरणाची नव्हे, संक्रमणाची केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 05:00 AM2021-05-13T05:00:00+5:302021-05-13T05:00:58+5:30

कोरोना संसर्गावर प्रभावी उपाययोजना या अर्थाने १८ वयोगटावरील प्रत्येकासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. मात्र, लसीकरण केंद्रांवर नियोजन नसल्यामुळे नागरिकांची गर्दी वाढत आहे. त्यातही शहरी केंद्रांवर गर्दी होत असल्याने आता ग्रामीणमध्ये धाव घेतल्याने तेथीलही केंद्रांवर रांगा आहेत. या रांगेत एखादा असिम्टमॅटिक  रुग्ण आल्यास त्याच्यापासून इतरांना संसर्ग होण्याची भीती आहे.

Centers for infection, not vaccinations | लसीकरणाची नव्हे, संक्रमणाची केंद्रे

लसीकरणाची नव्हे, संक्रमणाची केंद्रे

Next
ठळक मुद्देपहाटे ४ पासून रांग, फिजिकल डिस्टन्सचा अभाव, गर्दीमुळे वाढला कोरोनाचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात लसीकरणाच्या १३५ केंद्रांवर अलीकडे पहाटे ४ पासून रांगा लागत आहेत. बहुतेक केंद्रांवर शेकडो नागरिकांच्या रांगेत फिजिकल डिस्टन्सचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रे कोरोना प्रतिबंधासाठी की संसर्गवाढीसाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोना संसर्गावर प्रभावी उपाययोजना या अर्थाने १८ वयोगटावरील प्रत्येकासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. मात्र, लसीकरण केंद्रांवर नियोजन नसल्यामुळे नागरिकांची गर्दी वाढत आहे. त्यातही शहरी केंद्रांवर गर्दी होत असल्याने आता ग्रामीणमध्ये धाव घेतल्याने तेथीलही केंद्रांवर रांगा आहेत. या रांगेत एखादा असिम्टमॅटिक  रुग्ण आल्यास त्याच्यापासून इतरांना संसर्ग होण्याची भीती आहे.
महापालिका क्षेत्रात १८ व ग्रामीणमध्ये ११७ केंद्रांवर सद्यस्थितीत पाच टप्प्यांमधील लसीकरण होत आहे. आतापर्यंत ३,५२,४०७ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. सुरुवातीच्या काळात १६ जानेवारीला हेल्थ लाईन वर्कर व त्यानंतर फ्रंट लाइन वर्कर या दोन टप्प्यात लसीकरण करण्यात आले. साधारणपणे ६२,३१५ लाभार्थींनी या गटात लस घेतली आहे. यावेळेस जिल्ह्यात केवळ २० ते २२ केंद्र असताना केंद्रांवर रांगा नव्हत्या. त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर केंद्रे वाढली व केंद्रांवर गर्दीदेखील वाढायला लागली. काही दिवसांनंतर ४५ वर्षांवरील कोमार्बिडीटी आजारांच्या रुग्णांसाठी लसीकरण सुरू झाल्यानंतर पुन्हा काही केंद्रे नव्याने  सुरु करण्यात आली. आता १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. या गटासाठी स्वतंत्र केंद्रे तयार करण्यात आलेली आहेत. ऑनलाईन नोंदणी व अपाॅईंटमेंट असल्यामुळे या केंद्रांवर फारशी गर्दी नाही. मात्र, लिंक सुरु होत नाही. केंद्रांवर क्लिक करण्यापूर्वीच बुक झालेली दाखवितात. ऑनलाईन नोंदणी केव्हा सुरू होणार, याची पूर्वसूचना दिली जात नाही व दोन मिनिटांत केंद्र हाऊसफुल्ल दाखवित असल्याचा आरोप होत आहे.

रँडम सर्वेक्षणात दोन टक्के पॉझिटिव्ह
जिल्ह्यात निवडणूक निमित्ताने १० हजारांवर कर्मचाऱ्यांची करण्यात आलेली कोरोना चाचणी, याशिवाय रस्त्याने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पकडून त्यांच्या करण्यात आलेल्या कोरोना चाचण्या यामध्ये दोन ते तीन टक्के नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या शेकडो नागारिकांच्या रांगेतही काही पॉझिटिव्ह आहेत. हे गृहीत धरून फिजिकल डिस्टन्स ठेवणे महत्त्वाचे असताना, तसे होताना दिसत नाही.

अपंगांसह ज्येष्ठ नागरिकांची परवड
लसीकरण केंद्रांवर अंपगांसह ज्येष्ठ नागरिकांची परवड होत आहे. बहुतांश केंद्रांवर प्रसाधनगृह, पाणी व सावलीसाठी सुविधा नाही. मिळेल तेवढ्याच सावलीच्या आडोशाने नागरिक दाटीवाटीने उभे राहतात. जास्तच गर्दी वाढल्यास केंद्रांवर पोलिसांना पाचारण केले जाते. केंद्रावर महिलांचीदेखील मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचा आरोप होत आहे. अपंगांकरिता विशेष सुविधा कुठेही उपलब्ध नाहीत. 

गर्दी ओसरल्यावर पुन्हा टोकन वाटप
केंद्रांवर गर्दी कमी होण्यासाठी उपलब्ध लसींच्या प्रमाणात नागरिकांना टोकनचे वाटप करण्यात येते. त्यामुळे डोज संपल्याचे गृहीत धरून नागरिक केंद्रांवरून घरी जातात. त्यानंतर काही वेळाने पुन्हा टोकन देण्याचा प्रकार काही केंद्रांवर घडला. डोससाठी नंबर लागेल, या आशेने रांगेत उभे राहिलेल्या नागरिकांवर हा अन्याय आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा देण्यात येणारे टोकन कोणासाठी, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

Web Title: Centers for infection, not vaccinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.