सेंट्रल बॅँकेने हिरावला ४०० शेतकऱ्यांचा पीकविमा
By Admin | Published: March 31, 2016 12:17 AM2016-03-31T00:17:26+5:302016-03-31T00:17:26+5:30
सन २०१४-१५ च्या हंगामाकरिता मोर्शी तालुक्यामधील नेरपिंगळाईच्या ४०० शेतकऱ्यांनी स्थानिक सेंट्रल बँक आॅफ इंडिया शाखेत पिकांचा विमा काढला.
शेतकरी धडकले : साहेबराव तट्टे यांच्या नेतृत्वात दिले निवेदन
अमरावती : सन २०१४-१५ च्या हंगामाकरिता मोर्शी तालुक्यामधील नेरपिंगळाईच्या ४०० शेतकऱ्यांनी स्थानिक सेंट्रल बँक आॅफ इंडिया शाखेत पिकांचा विमा काढला. दुष्काळीस्थिति असल्याने पीकविमा मंजूर झाला. मात्र, शेतकऱ्यांचा विमाहप्ता बॅँकेने रिजनल शाखेकडे पाठविलाच नसल्याने शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. पीकविमा मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी बुधवारी माजी आमदार साहेबराव तट्टे यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्त कार्यालयात धडक देऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.
नेरपिंगळाई येथील ४०० शेतकऱ्यांनी स्थानिक सेंट्रल बॅँक शाखेत रोखीने व कर्जदार शेतकऱ्यांनी त्यांच्या रकमेमधून पीकविमा काढला. इतर बॅँकांद्वारा शेतकऱ्यांना मागील वर्षाचा विमा मिळाला. मात्र, सेंट्रल बॅँकेच्या व्यवस्थापकांनी पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा वाटा अकोला येथील रिजनल आॅफिसमध्ये पाठविला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविम्याची रकम मिळण्यास विलंब होत आहे. शेतकऱ्यांनी यापूर्वी २२ आॅगस्ट आणि १६ नोव्हेंबरला निवेदन दिले असता व्यवस्थापकाने शेतकऱ्यांच्या नावाची खोटी तक्रार दिल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. शेतकऱ्यांनी २३ नोव्हेंबर २०१५ रोजी उपोषण केले असता बॅँकेद्वारा ९० दिवसात पीकविम्याची रक्कम परत मिळेल, असे आश्वासन दिले. मात्र, ही मुदत देखील उलटून गेली आहे. त्यामुळे बॅँक व्यवस्थापनावर कारवाई करुन पीकविम्याची रक्कम मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. मागणी पूर्ण न झाल्यास आत्मदहनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी प्रकाश कनेर, पद्माकर वाकोडे आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.