मध्यवर्ती कारागृहालगतचा परिसर काळोखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 01:15 AM2018-11-16T01:15:21+5:302018-11-16T01:16:31+5:30
महापालिका हद्दतीतील सेंट्रल जेल रोड ते हायवे पुलापर्यंत चांदूर रेल्वे मार्गावरील पथदिवे महिनाभरापासून बंद असल्याने अपघातासह इतर धोका होण्याची भीती निर्माण झाली आहे.
इंदल चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिका हद्दतीतील सेंट्रल जेल रोड ते हायवे पुलापर्यंत चांदूर रेल्वे मार्गावरील पथदिवे महिनाभरापासून बंद असल्याने अपघातासह इतर धोका होण्याची भीती निर्माण झाली आहे.
साडेआठ लाख लोकसंख्येची जबाबदारी सांभाळणाऱ्या महापालिकेच्या हद्दीतील चपराशीपुरा चौकापासून चांदूर रेल्वे मार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्ता अवरुद्ध तर झालाच आहे. शिवाय, प्रचंड वर्दळीमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या एका भागाचे काम सुरू असल्याने एकाच मार्गाने ये-जा करावी लागत आहे. त्यातही पथदिवे बंद असल्याने खड्ड्यांचा मार सहन करीत जीव मुठीत घेऊन वाहनधारकांना मार्ग काढावा लागत आहे. किरकोळ अपघात घडत असून, महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. मात्र, महापालिकेला कधी जाग येणार, असा सवाल नागरिक करीत आहेत.
महापालिकेची कर वसुली नियमित
चपराशीपुरा परिसर महापालिकेच्या हद्दीत येत असल्याने नागरिकांकडून नियमित कर वसूल करताना महापालिकेला हा आपल्या हद्दीतील परिसर वाटतो. मग, तेथील समस्या सोडविणे अगत्याचे नव्हे काय, असा सवाल नागरिकांनी केला आहे.
कारागृहाला धोक्याची संभावना
याच मार्गावर असलेल्या सेंट्रल जेलमध्ये विविध गुन्ह्यांतील गुन्हेगार बंदीस्त असून, हे कारागृह अधिक क्षमतेचे असल्याने येथे आंतरराष्ट्रीय गुन्ह्यातील कैद्यांना शिफ्ट केला जातात. अशा स्थितीचा गैरफायदा घेऊन एकतर बंदी पळून जाऊ शकतात. तसेच बंदींसोबत वैमनस्य असलेल्या व्यक्तींकडून येथील अंधाराचा गैरफायदा घेत अनुचित प्रकार घडवून आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने आता तरी जागे व्हायला हवे, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
या मार्गावरील काम सुरू असताना सर्व केबल तोडले गेले. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. मात्र, त्यासंबंधी प्रकाश विभागाशी बोलून त्वरित तोडगा काढू.
- बबलू शेखावत, नगरसेवक, वडाळी प्रभाग, अमरावती