मोर्शी आगारावर शेकडोंचा जमाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 09:58 PM2019-02-06T21:58:11+5:302019-02-06T21:58:36+5:30
प्रवीण वैराळे यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या पत्नीला नोकरी व ३० लाख रुपयांची मदत देण्याच्या मागणीसाठी सुमारे ३०० च्या संख्येने हिवरखेडवासी मोर्शी आगारात बुधवारी धडकले. त्यांनी आगार व्यवस्थापकाच्या कक्षात ठिय्या दिला. मागण्या मान्य होत नसल्यास मृतदेह येथे आणण्याचा इशारादेखील त्यांनी दिला. विभाग नियंत्रकांकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : प्रवीण वैराळे यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या पत्नीला नोकरी व ३० लाख रुपयांची मदत देण्याच्या मागणीसाठी सुमारे ३०० च्या संख्येने हिवरखेडवासी मोर्शी आगारात बुधवारी धडकले. त्यांनी आगार व्यवस्थापकाच्या कक्षात ठिय्या दिला. मागण्या मान्य होत नसल्यास मृतदेह येथे आणण्याचा इशारादेखील त्यांनी दिला. विभाग नियंत्रकांकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मोर्शी आगारात मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास वर्कशॉपमधील अनियंत्रित एसटीने वाहक प्रवीण वैराळे (३०) यांना चिरडले, तर वाहतूक निरीक्षक भास्कर महल्ले (५०) गंभीर जखमी झाले. प्रवीण वैराळे यांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी ते ड्युटीची नोटशीट बघत होते. अनियंत्रित झालेली नादुरुस्त एसटी वर्क शॉपमधील तुलशीदास डाहे यांनी ट्रायलसाठी बाहेर काढली होती. प्रशासनाचा बेजबाबदारपणा प्रवीण वैराळे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा संताप व्यक्त करीत सुमारे ३०० जणांचा जमाव बुधवारी मोर्शी आगारात सरपंच विजय पाचारे, उपसरपंच मंगेश पवार, नीलेश चौधरी यांच्या नेतृत्वात धडकला. यावेळी अनिल अमृते, रामेश्वर चव्हाण, राजू गेडाम, योगेश धोटे, नीलेश वाडेकर, दिलीप कवटकर, सुरेश पारिसे, भाजप तालुकाध्यक्ष अजय आगरकर उपस्थित होते. प्रवीण वैराळे यांच्यावर बुधवारी अडीचच्या सुमारास हिवरखेड या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार पार पडले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन वर्षांची चिमुकली आहे. मोर्शी आगारात जमाव धडकल्यामुळे निर्माण झालेले तणावाचे वातावरण पाहता, आगारातून एसटीचे आवागमन थांबविण्यात आले होते.
अशा झाल्या वाटाघाटी
प्रवीण वैराळे यांच्या पत्नीला नोकरी, ३० लाख रुपयांची मदत तसेच दोषींवर कारवाईची मागणी एसटी प्रशासनाकडे मांडण्यात आली. याप्रसंगी पोलीस व वरिष्ठ एसटी अधिकारी दाखल झाले होते. यामध्ये विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे, आगार व्यवस्थापक सुनील भालतडक, ठाणेदार राजेश राठोड, वरिष्ठ सुरक्षा अधिकारी वीरेंद्रसिंह ठाकूर, धम्मपाल डोंगरे, कर्मचारी वर्ग अधिकारी राहुल तांबडे यांचा समावेश होता. विभाग नियंत्रकांनी आंदोलकांच्या मागणीनुसार पाच हजार रुपयांची तात्काळ मदत दिली व शैक्षणिक गुणवत्तेनुसार महामंडळात एका व्यक्तीला नोकरीचे लेखी आश्वासन दिले.