अमरावतीची लेक शिर्डी संस्थानच्या सीईओपदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:16 AM2021-09-06T04:16:13+5:302021-09-06T04:16:13+5:30
फोटो - ०५एएमपीएच०१ अनिल कडू - परतवाडा (अमरावती) : शिर्डी संस्थानच्या सीईओपदी नियुक्त झालेल्या आयएएस अधिकारी भाग्यश्री बानायत या ...
फोटो - ०५एएमपीएच०१
अनिल कडू - परतवाडा (अमरावती) : शिर्डी संस्थानच्या सीईओपदी नियुक्त झालेल्या आयएएस अधिकारी भाग्यश्री बानायत या अमरावती जिल्ह्यातील मोर्शीच्या आहेत. त्यांच्या नियुक्तीने अमरावतीसह मोर्शीला एक वेगळाच मान मिळाला आहे.
भाग्यश्री बानायत यांचे शालेय शिक्षण मोर्शी तालुक्यातील हिवरखेड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले, तर मोर्शी शहरातून त्या बीएस्सी झाल्या. आई तुळसाबाई, वडील भीमराव हे दोघेही शिक्षक असल्याने घरी शैक्षणिक वातावरण होते. त्यामुळे बीएस्सीनंतर त्या बीएड झाल्या. पुढे एक वर्ष एमएससी केले. यादरम्यान वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर आथिर्क दृष्टीने सक्षम व्हायचे त्यांनी ठरवले. अमरावती महानगरपालिकेत त्यांना विषयतज्ज्ञ म्हणून काम मिळाले. आईच्या आजारपणात सेवा-शुश्रुषा करून, घरकाम सांभाळून त्या गावाहून अमरावतीला ये-जा करीत. त्यांना सर्व भर स्व-अध्ययन पद्धतीवर द्यावा लागला.
प्रथम २००५ साली प्रकल्प अधिकारी, २००६ साली तहसीलदार, २००७ साली सहाय्यक आयुक्त, विक्रीकर विभाग अशा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांची सलग निवडी होत गेली. २००६ साली त्यांची नायब तहसीलदार व प्रकल्प अधिकारी, शिक्षण विभाग या दोन्ही वर्ग-२ च्या पदांसाठी निवडी झाली. त्यांनी दोन्ही पदे नाकारली. दुसरीकडे सततच्या गैरहजेरीमुळे अमरावती महानगरपालिकेची नोकरी गेली. परंतु, त्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देत राहिल्या. २०१२ साली त्या भारतीय प्रशासकीय अधिकारी म्हणून निवडल्या गेल्या. इतकंच नव्हे तर, त्यावर्षी निवड झालेल्या त्या महाराष्ट्र राज्यातील एकमेव महिला अधिकारी ठरल्या होत्या.