सीईओंनी मागितले झेडपी सदस्याला पुरावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:14 AM2021-02-24T04:14:57+5:302021-02-24T04:14:57+5:30
अमरावती : कोरोना विमा उतरविणाऱ्या काही व्यक्तींना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा खोटा अहवाल देऊन विमा रक्कम लाटण्याचा प्रकार शहरात सुरू ...
अमरावती : कोरोना विमा उतरविणाऱ्या काही व्यक्तींना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा खोटा अहवाल देऊन विमा रक्कम लाटण्याचा प्रकार शहरात सुरू असल्याचा अनुभव आपल्यालाच आला. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी सोमवारी आमसभेत केली. दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्षांनी याच्या चौकशीचे प्रशासनाला आदेश दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी (सीईओ) अमोल येडगे यांनी प्रकाश साबळे यांना पत्र पाठवून यासंबंधी काही पुरावे किंवा दस्तऐवज दोन दिवसांत आरोग्य अधिकाऱ्यांकडे सादर करावेत, अशी सूचना केली आहे.
विमा संरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी मागणीप्रमाणे जिल्ह्यातील काही प्रयोगशाळांतत कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवाल मिळत असून, त्यामाध्यमातून आर्थिक व्यवहार होत असल्याचा मुद्दा साबळे यांनी आमसभेत मांडला होता. यावरून प्रशासनात खळबळ उडाली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला या प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.