सीईओंनी घेतला पीआरसीच्या पूर्वतयारीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:14 AM2021-09-26T04:14:21+5:302021-09-26T04:14:21+5:30
सुटीच्या दिवशीच बैठक; आरोग्य, पाणी पुरवठा व अन्य दोन विभागांच्या सभा अमरावती : महाराष्ट्र विधानमंडळ पंचायत राज समितीचा आठवड्या ...
सुटीच्या दिवशीच बैठक; आरोग्य, पाणी पुरवठा व अन्य दोन विभागांच्या सभा
अमरावती : महाराष्ट्र विधानमंडळ पंचायत राज समितीचा आठवड्या भरानंतर जिल्हा दौरा निश्चित झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी पंचायत राज समितीच्या पूर्वतयारी संदर्भात डे टू डे विभागनिहाय आढावा बैठकीचे नियोजन केले आहे. त्यानुसार शनिवार २५ सप्टेंबर या सुटीच्या दिवसीही ग्रामीण पाणीपुरवठा, जिल्हा आरोग्य विभाग, कृषी विभाग आणि जिल्हा पशुसंवर्धन विभागाचा आढावा घेतला.
या बैठकीमध्ये सन २०१७-१८ च्या वार्षिक प्रश्नावलीच्या अनुषंगाने विस्तृत माहिती व त्या योजनांची सद्यस्थिती, तत्कालीन उपस्थित अधिकाऱ्यांसोबत केलेला पत्रव्यवहार, एखाद्या योजनेतील वैशिष्टपूर्ण केलेले कार्य, योजना राबविण्याबाबत काही अडचणी आहेत का ? यासोबतच पंचायत राज समितीच्या दौऱ्यामुळे आवश्यक प्रशासकीय कामांची माहिती, संबंधित विभागाकडून कुठल्या स्तरावर कारवाई झाली आहे याची माहिती संबंधित खातेप्रमुखाकडून सीईओंनी जाणून घेतली. याशिवाय अन्यही प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बाॅक्स
५० हजार लसीकरणाचे टार्गेट
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची मोहीम जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून ग्रामीण भागात राबविली जात आहे. मात्र, लसीकरणाची गती वाढविण्यासाठी एकाच दिवशी ५० हजार लसीकरण करण्याचे उद्दिष्ट सीईओ अविश्यांत पंडा यांनी ठेवले आहे. याअनुषंगाने शनिवारी सीईओंच्या दालनात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासमवेत सर्व संबंधित अधिकाऱ्यांची लसीकरणाबाबत बैठक घेतली. यावेळी येत्या मंगळवारी जिल्हाभरात एकाच दिवशी ५० हजार लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याकरीता लसीचा साठा किती आहे. सिरींज साठा उपलब्ध आहे. याची माहिती घेऊन नियोजन करण्याचे निर्देश सीईओंनी आरोग्य यंत्रणेला दिले आहेत.