सीईओंची ‘सरप्राईज व्हिजिट‘ अन् खातेप्रमुख गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:10 AM2021-07-21T04:10:55+5:302021-07-21T04:10:55+5:30
अमरावती : अधिकारी असो वा कर्मचारी प्रत्येकाने शासकीय कामकाजाच्या दिवशी सकाळी ९.४५ वाजता कार्यालयात हजर राहायला हवे, असा ...
अमरावती : अधिकारी असो वा कर्मचारी प्रत्येकाने शासकीय कामकाजाच्या दिवशी सकाळी ९.४५ वाजता कार्यालयात हजर राहायला हवे, असा शासनाचा नियम आहे. मात्र या नियमाला पायदळी तुडविण्याची जणू स्पर्धाच लागली असते. बहुतांश कर्मचारी आपल्या सोयीने येत असतात. मंगळवारी मात्र जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यपालन अधिकारी अविश्यांत पंडा यांनी सकाळी १० वाजतादरम्यान विविध विभागांची सरप्राईज व्हिजिट केली. दरम्यान, पाणीपुरवठा, सिंचन या विभागाचे खातेप्रमुख कार्यालयात गैरहजर असल्याचे आढळून आले. या दोन्ही अधिकाऱ्यांना सीईओंनी समजपत्र बजावण्याचे निर्देश डेप्युटी सीईओंना दिले. सीईओंच्या या सरप्राईज व्हिजिटमुळे अनेक लेटलतिफांची तारांबळ उडाली आहे.
जिल्हा परिषद मुख्यालयात असलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा, जलसंधारण, वित्त, समाजकल्याण, पंचायत आदी विभागांना सीईओ अविश्यांत पंडा व सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे यांनी मंगळवारी सकाळी १० वाजता दरम्यान आकस्मिक भेट देऊन कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती तपासली. यावेळी पाणीपुरवठा विभागात कर्मचारी हजर होते. मात्र, विभागप्रमुख गैरहजर आढळून आले. असाच प्रकार जलसंधारण विभागातही घडला. यापाठोपाठ समाजकल्याण विभागाला दिलेल्या भेटीत खातेप्रमुख हजर नव्हते. मात्र, त्यांच्याकडे अतिरिक्त पदभार असल्याने ते त्यांच्या कार्यालयात असल्याचे सांगण्यात आले. एक महिला कर्मचारी रजेवर असल्याचे सांगण्यात आले. यानंतर सीईओंनी मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांच्या कार्यालयाची पाहणी सीईओंनी केली. यावेळी कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित समाधानकारक असल्याचे निदर्शनास आले. अशातच दोन विभागाचे खातेप्रमुख कार्यालयात कार्यालयीन वेळेतही गैरहजर असल्याचे आढळल्याने सीईओंनी तीव्र नाराजी व्यक्त करीत या दाेन्ही अधिकाऱ्यांना समजपत्र बजावले. यापुढे असा प्रकार होता कामा नये, अशी सूचना तत्काळ देण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे अधिकाऱ्यांना दिले.