सीईओंचा ‘टाईम बाऊंड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 10:28 PM2018-06-24T22:28:29+5:302018-06-24T22:30:00+5:30
जिल्हा परिषदेत फायलींचा निर्धारित वेळेत निपटारा करण्याच्या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी वेळापत्रक ठरवून दिले आहे. फायलींवर एकाच प्रवासात निर्णय घेऊन कामांना गती द्या, अशा सूचना त्यांनी सर्व विभागांना दिल्या. प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याची जबाबदारी आणि कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून, विलंब लावणाऱ्यांवर दप्तरदिरंगाई कायद्यांतर्गत कारवाई होईल, असा इशारा त्यांनी दिला.
जितेंद्र दखने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषदेत फायलींचा निर्धारित वेळेत निपटारा करण्याच्या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी वेळापत्रक ठरवून दिले आहे. फायलींवर एकाच प्रवासात निर्णय घेऊन कामांना गती द्या, अशा सूचना त्यांनी सर्व विभागांना दिल्या. प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याची जबाबदारी आणि कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून, विलंब लावणाऱ्यांवर दप्तरदिरंगाई कायद्यांतर्गत कारवाई होईल, असा इशारा त्यांनी दिला.
फायलींचा निपटारा करण्यासाठी कालमर्यादा असावी व अनावश्यक फेऱ्या थांबाव्यात, यासाठी अध्यक्षांसह सर्व पदाधिकारी आग्रही आहेत. सर्वसाधारण स्थायी सभांतून अनेकदा मागणीही करण्यात आली. संचिकेस विलंब होत असल्याचे काही महिन्यांपूर्वी पदभार घेतलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी फाइल कोणत्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी किती दिवस असावी आणि किती दिवसांत तिचा निपटारा करावा, याचे सूक्ष्म नियोजन केले आहे. याचा कालबद्ध आराखडा तयार करून सर्व विभागप्रमुखांना नोटीसद्वारे कळविणार आहे. कायदा शासन निर्णय व नियमांचा संदर्भ देत संचिका पुढे पाठवाव्या, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. विलंब करणाºयांवर दिरंगाईची कारवाई केली जाणार आहे.
आठवड्यात निर्णय
संचिकेवर कनिष्ठ सहायकांनी दोन दिवसांत निर्णय घ्यावा. वरिष्ठ सहायकांनी दोन दिवस, कनिष्ठ किंवा सहायक प्रशासन अधिकाºयांनी एक दिवस, वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांनी एक दिवस आणि खातेप्रमुखांनी दोन दिवसांत फाइल पुढे पाठवावे. सामान्य प्रशासन विभाग आणि वित्त विभागालाही हा निर्णय लागू असून, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांना दोन दिवसांत निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नागरिकांची सनद हवी
नव्याने रुजू झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी सकारात्मक असल्याने कामाला गती मिळाली आहे. त्यांना सर्व पदाधिकारी व सदस्यांचे नेहमी सहकार्य राहील. संचिका वेळेत निकाली काढण्यासाठी कालमर्यादा घालून देण्याचा निर्णय स्तुत्य आहे. आता प्रत्येक विभागात नागरिकांची सनदही लावण्यात यावी, अशी मागणी पुढे आली आहे.
फायलींचा निर्धारित वेळेत निपटारा करण्याच्या उद्देशाने विहित मुदतीत आवश्यक कारवाई करावी. कारण नसताना त्या पेंडिंग ठेवू नये. दप्तरदिरंगाई केल्यास सदर कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल.
- मनीषा खत्री
सीईओ, जिल्हा परिषद