सिईओंची चांदूर बाजार कोविड केंद्राला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:10 AM2021-05-28T04:10:28+5:302021-05-28T04:10:28+5:30
समाधान, गृहविलगीकरणाला बंदी चांदूर बाजार : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अविश्यांत पंडा यांनी गुरुवारी सकाळी चांदूर बाजार येथील ...
समाधान, गृहविलगीकरणाला बंदी
चांदूर बाजार : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अविश्यांत पंडा यांनी गुरुवारी सकाळी चांदूर बाजार येथील तिरुपती सभागृहातील जम्बो पॉइंट सेंटरला भेट दिली. दरम्यान त्यांनी येथे उपलब्ध सोयी व सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. तसेच तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनातर्फे गृहविलगीकरणाला बंदी घालण्यात आली आहे. यानंतर रुग्णांना कोविड सेंटर येथेच ठेवण्यात यावे, यासाठी हालचाली सुरू केले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन युद्धस्तरावर प्रयत्न करीत आहे. गावोगावी कोविड सेंटर उभारली जात आहे. अशात चांदूर बाजार येथे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून तिरुपती मंगलम येथे १०० बेडचे सुसज्ज कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.
या कोविड सेंटरला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अविश्यांत पंडा यांनी गुरुवारी सकाळी भेट दिली. यावेळी तहसीलदार धीरज स्थूल, गटविकास अधिकारी प्रफुल्ल भोरगडे, तालुका आरोग्य अधिकारी ज्योत्स्ना भगत, वैद्यकीय अधिकारी पारवे प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्य कार्यपालन अधिकारी पंडा यांनी चांदूर बाजार येथील तिरुपती मंगलम येथे सुरू करण्यात आलेले १०० बेडचे जम्बो कोविड सेंटर येथे रुग्णांची तपासणी व राहण्याची व्यवस्थाबाबत संपूर्ण माहिती घेतली. सुसज्ज व्यवस्थेबाबत आरोग्य व तहसील प्रशासनाचे समाधान व्यक्त केले.
राज्यमंत्री बचू कडू यांचा संकल्पनेतून उभारलेल्या या कोविड सेन्टरप्रमाणेच आसेगाव व शिरजगाव कसबा येथे ही कोविड सेन्टर सुरू करण्यात यावी. यात लागणाऱ्या खाटा व इतर अडचणींना जिल्हा परिषद प्रशासन सर्वस्व मदत करणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी तालुका यंत्रणेला दिला. तालुक्यात रुग्ण संख्या कमी होत असल्याबाबत त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. कोरोनाच्या चाचण्या गावोगावी वाढविण्याचे निर्देशही त्यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिले.
चांदूर बाजार येथील कोविड सेंटरला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शंभर खाटा चा सह राहण्याची व दर्जेदार भोजनाची व्यवस्था उपलब्ध करून दिली. त्यामुळे असेच लोकसहभाग इतर ठिकाणी उपलब्ध झाल्यास लवकरच जिल्ह्यातून कोरोनाची साखळी तोडण्यास प्रशासनाला यश मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.