शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पदवी प्रमाणपत्र प्रदान समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 11:22 PM2017-08-20T23:22:38+5:302017-08-20T23:22:59+5:30
विदर्भातील अभियांत्रिकी व तंत्रशिक्षणातील नामांकित अग्रगण्य संस्था शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती या संस्थेचा संस्था पातळीवरील सातवा (आठव्या तुकडीचा) पदवी प्रमाणपत्रे प्रदान समारंभ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विदर्भातील अभियांत्रिकी व तंत्रशिक्षणातील नामांकित अग्रगण्य संस्था शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती या संस्थेचा संस्था पातळीवरील सातवा (आठव्या तुकडीचा) पदवी प्रमाणपत्रे प्रदान समारंभ रविवारी संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृह उत्साहात पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सात विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली आहे.
पदवी प्रमाणपत्र समारंभासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू एम.जी. चांदेकर, अ.भा. तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्लीचे उपाध्यक्ष एम.पी.पुनिया, महाविद्यालय व्यवस्थापन मंडळाचे सदस्य मोहम्मद झुहेर, कुणाल टिकले, प्राचार्य आर.एस.दाळू, शैक्षणिक अधिष्ठाता अनंत धात्रक, परीक्षा नियंत्रक क्षितिजा कदम, विविध विद्या शाखांचे विभागप्रमुख, अधिष्ठाता व इतर निमंत्रित सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते. प्राचार्य आर.एस. दाळू यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा वार्षिक अहवाल सादर केला.
यावेळी विविध अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या ४५२ बी. टेक व ११५ एम. टेक विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे व गुणपत्रे प्रदान करण्यात आली.
कुलगुरू एम.जी.चांदेकर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी बहुमूल्य मार्गदर्शन केले. आजच्या युगातील झपाट्याने बदलणारे तंत्रज्ञान आत्मसात करून स्वत: सदोदित सिद्ध ठेवण्याचे व अखंडित ज्ञानार्जन करून बदलणाºया भारताच्या विकासपर्वात सक्षम अभियंता व सुजाण नागरिक म्हणून सहभागी होण्याचे आव्हान त्यांनी विद्यार्थ्यांना केले. कर्तव्यनिष्ठेसोबत कदापिही तडजोड करू नका. सामाजिक जबाबदारीसोबतच स्वत:ला सक्षम अभियंता बनून जग पादाक्रांत करा व स्वत:ला सिद्ध करा, असा मंत्र विद्यार्थ्यांना अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्लीचे उपाध्यक्ष एम.पी. पुनिया यांनी त्यांच्या संबोधनात दिला. सुवर्ण पदक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांसह सर्वांचे कौतुक केले. आपल्यातील क्षमतांचा विस्तार करून आकाशाला गवसणी घालण्याचे आव्हान त्यांनी विद्यार्थ्यांना केले. अभ्यासक्रमांना जागतिक गरजांसाठी सदोदित अद्ययावत व सुसंगत ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली व यासाठी अखिल भारतीय तंत्र परिषदेकडून सर्वतोपरी मदत संस्थेला करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. राष्टÑगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. शैक्षणिक अधिष्ठाता अनंत धात्रक व सुभदा ठाकरे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते.