कोल्हा येथील रेशन दुकानदाराचे प्राधिकारपत्र रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:11 AM2021-07-25T04:11:31+5:302021-07-25T04:11:31+5:30
अचलपूर : तालुक्यातील कोल्हा येथील यू.एम. तायडे यांच्या स्वस्त धान्य दुकानाच्या तपासणीत अचलपूर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाला धान्य वाटपात ...
अचलपूर : तालुक्यातील कोल्हा येथील यू.एम. तायडे यांच्या स्वस्त धान्य दुकानाच्या तपासणीत अचलपूर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाला धान्य वाटपात अनेक अनियमितता आढळून आल्या. धान्याचा मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे सिद्ध होताच त्या स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द करण्याची व अपहार झालेल्या धान्याची वसुली बाजारभावाने करण्याची शिफारस जिल्हा पुरवठा विभागाकडे करण्यात आली आहे.
अचलपूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षण अधिकारी शैलेश देशमुख, पुरवठा निरीक्षक स्वाती वरूडकर, अंकुश काळे, उमेश पारधी, वाहूरवाघ यांच्या चमूने रेशन दुकानांची आकस्मिक तपासणी केली. त्यात अनेक त्रुटी आढळून आल्या. सदर स्वस्त धान्य दुकानात धान्य वेळेवर पोहोचूनसुद्धा दुकानदार दुकान उघडून धान्यवाटप करीत नाही, तर ते महिन्याच्या १५ ते २० तारखेला वितरित करण्यात येते, असे तपासणीदरम्यान आढळून आले.
दुकानदार लाभार्थींना पावती देत नव्हता तसेच शासकीय दरापेक्षा जास्त पैसे घेत होता. शासनाच्या मोफत धान्याचे वाटपसुद्धा पैसे घेऊन करीत होता. नियमित धान्यवाटपात भेदभाव करीत होता. धान्यवाटपापूर्वी गावात दवंडी देऊन लाभार्थ्यांना सूचित करीत नव्हता. तपासणीदरम्यान २८ क्विंटल गहू, १७ क्विंटल तांदूळ, २४ किलो साखर, शाळेत तीन क्विंटल चणा डाळ व ६९ किलो मका कमी आढळून आला. यावेळी येथून ३९ लाभार्थींचे बयाण नोंदविण्यात आले
प्रशासनाकडून स्वस्त धान्य दुकानाचे तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. यादरम्यान कोल्हा येथील कारवाईने स्वस्त धान्य दुकानदार यांचे धाबे दणाणले आहे. स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द झाल्याचे हे महिनाभरातील दुसरे प्रकरण आहे.
----------------
पुरवठा अधिकाऱ्याचा कोट येत आहे.