मिरचीच्या तीन कोटींच्या खरेदी-विक्रीचा सेस गहाळ; बाजार समितीच्या सचिव, पर्यवेक्षकावर ठपका?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 12:51 PM2023-06-29T12:51:16+5:302023-06-29T12:54:33+5:30
चौकशी अहवाल सादर : अंजनगाव सुर्जी कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रकरण
अंजनगाव सुर्जी (अमरावती) : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील मिरची बाजारात तीन कोटी रुपयांच्या खरेदी- विक्रीवरील सेस गहाळ झाल्याच्या प्रकरणात चौकशी अहवाल आला असून, त्यामध्ये बाजार समिती सचिव, पर्यवेक्षकांवर ठपका ठेवण्यात आल्याची माहिती आहे. त्यादृष्टीने जिल्हा उपनिबंधकांकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. दुसरीकडे बाजार समिती सचिवांनी मात्र आपल्यावरील आरोपांचे खंडन केले.
अंजनगाव सुर्जी येथे बाजार समितीच्या आवारात, समितीमार्फत मिरची बाजार चालविला जातो. मिरची बाजारातील घोळाबाबत ‘लोकमत’च्या दणक्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली. समितीने व्यवहार तपासून घोळावर शिक्कामोर्तब केले. बाजार समितीला मिळू शकणाऱ्या लाखोंच्या सेसला चुना लावल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे बाजार समितीच्या झालेल्या नुकसानभरपाईच्या मिरचीचा ठसका कुणाकुणाला बसणार, हे जिल्हा उपनिबंधकांच्या कारवाईनंतरच पुढे येईल.
बाजार समितीवर गंभीर ताशेरे
कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरची बाजारात अनेक संदिग्ध घडामोडी घडत असताना बाजार समितीचे सचिव गजानन नवघरे व पर्यवेक्षक अमर साबळे यांनी बाजारात बेकायदा मंडळींना थातूरमातूर पत्र देऊन पाठराखण केली होती. ही पाठराखण त्यांच्यावर उलटली असल्याचे चौकशी अहवालात समोर आले आहे. चौकशी समितीने बाजार समितीच्या रेकॉर्डनुसार लायसन्सधारक मिरची व्यापारी नसणे, शेतकऱ्यांकडून माल येणे अपेक्षित असताना लायसन्सधारक व्यापाऱ्यांनी खरेदी करून सौदा चिठ्ठी देणे, हिशेब पट्टी नसणे, मिरची बाजार समितीच्या आवक रजिस्टरला थातूर-मातूर नोंद, बाजार समितीकडून अप्रमाणित बिलाचा वापर, वेगवेगळ्या खरेदीदारास एकाच क्रमांकाचे बिल देणे आदी गंभीर ताशेरे ओढण्यात आले आहेत.
जिल्हा उपनिबंधकांकडे लक्ष
बिले वेळीच तपासून सेस वसूल केला नसल्याने मिरची खरेदी-विक्रीबाबत बाजार समितीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. हा सेस कुणाकडून वसूलपात्र आहे, हे जिल्हा उपनिबंधकांच्या चौकशी अहवालाबाबत भूमिकेवरून स्पष्ट होईल.
जिल्हा उपनिबंधकांना पाठविला अहवाल
जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभारे यांना याबाबत फोनवर संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तथापि, सहायक उपनिबंधक राजेश यादव यांनी सांगितले, चौकशी पूर्ण झाली असून, त्याचा अहवाल आम्ही जिल्हा उपनिबंधकांना पाठविला. त्याबाबत ते समितीला कोणते निर्देश देतात, हे लवकरच कळेल.
बिल बुके घेऊन व्यापाऱ्यांचे पलायन
बिल बुकातील घोळ लक्षात आल्यानंतर काही महिन्यांपूर्वी व्यापारी ती बिले बुके घेऊन पळून गेले होते. यानंतर ती एकाच अर्जावर गहाळ झाल्याचा अर्ज सचिव गजानन नवघरे यांच्याकडे आला. ती बिल बुके अद्याप मिळालेली नाहीत. त्यावर अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही.
मिरची बाजारातील सेसमध्ये कुठलाही घोळ झालेला नाही. एकूण १७ हजार रुपये सेसपैकी १५ हजार ४१८ रुपये धनादेशाद्वारे व उर्वरित रक्कम रोख वसूल केली.
- गजानन नवघरे, सचिव, बाजार समिती