मंगळसूत्र हिसकावले; चेनस्नॅचरला दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
By प्रदीप भाकरे | Updated: February 21, 2023 16:39 IST2023-02-21T16:38:11+5:302023-02-21T16:39:20+5:30
२० हजार रुपये दंड; न भरल्यास सहा महिने अतिरिक्त शिक्षा

मंगळसूत्र हिसकावले; चेनस्नॅचरला दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
अमरावती : एका महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र हिसकावून पळ काढल्याच्या प्रकरणात चेनस्नॅचर आरोपीला दोन वर्षे सक्तमजुरी, २० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. न्या. पंकज बिदादा यांच्या न्यायालयाने २० फेब्रुवारी रोजी हा निर्णय दिला. जगजितसिंग प्यारासिंग टांक (२८, नांदगावपेठ) असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे.
चक्रपाणी कॉलनी येथील एक २६ वर्षीय महिला फ्रेंड्स कॉलनीतील गणपती मंदिराजवळून पायदळ जात असताना एका दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसकावून पळ काढला होता. ८ डिसेंबर २०२१ रोजीच्या त्या घटनेप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास केला.
तपासादरम्यान जगजितसिंगला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने त्या गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान, गाडगेनगर ठाण्यातील सहायक पोलीस निरिक्षक महेश इंगोले यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. ॲड. ज्वाला जामनेकर यांनी सरकारी बाजू मांडली. दोन्ही पक्षाचे युक्तीवाद ऐकून न्यायालयाने जगजितसिंगला दोषी मानून शिक्षा सुनावली. यात जमादार मुरलीधर डोईजड यांनी पैरवी केली