एसटीच्या महिला वाहकावर चाकूहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 10:15 PM2018-03-20T22:15:10+5:302018-03-20T22:15:10+5:30
आॅनलाईन लोकमत
अमरावती : आईला एसटीतून उतरून दिल्याच्या कारणावरून मुलाने एसटीच्या महिला वाहकावर प्राणघातक हल्ला चढविल्याची घटना मंगळवारी माहुली जहागीर बसस्थानकावर घडली. कविता गावंडे (३०, रा. अमरावती) असे जखमी महिला वाहकाचे नाव आहे. याप्रकरणात माहुली पोलिसांनी आरोपी कमलेश सावरकर नामक तरुणाला अटक केली आहे.
अमरावती आगाराची एसटी बस क्रमांक एमएच ४०-२३०० दाभेरी जात असताना एक महिला प्रवासी नांदगाव पेठ बसस्थानकावरून बसली. त्या महिलेने तिकीट घेण्यावरून महिला वाहक कवितासोबत वाद केला. वाद विकोपाला जात असल्याचे पाहून कविता यांनी त्या महिलेस नांदगावपेठच्या पेट्रोल पंपाजवळ उतरून दिले. त्यानंतर एसटी दाभेरीकडे रवाना झाला. दरम्यान त्या महिलेने मुलगा कमलेशला घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.
अमरावती बसस्थानकावर चक्काजाम
कमलेशने माहुली बसस्थानकावर अमरावती-दाभेरी बस थांबताच वाहक कवितावर चाकुहल्ला चढविला. अचानक झालेल्या या हल्ल्याने गोंधळ उडाला. कविता यांना तत्काळ माहुलीच्या येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यांच्या हाता-पायावर चाकूच्या गंभीर जखमा झाल्या होत्या. उपचारानंतर कविता यांनी माहुली पोलिसांकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी कमलेश सावरकरविरुद्ध भादंविच्या कलम ३०७, ३५२ अन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. दरम्यान, महिला वाहकावर हल्ला झाल्याची माहिती अमरावती मध्यवर्ती बसस्थानकातील चालक-वाहकांना मिळताच त्यांनी बसस्थानकात चक्काजाम केले. यावेळी कोतवाली पोलिसांनी पाचारण केले. पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांच्यासह ताफ्याने आंदोलकांना शांत केले. त्यानंतर एसटी बसचे आवागमन पूर्वरत झाले.
महिला वाहकाच्या तक्रारीवरून आरोपी कमलेश सावरकरविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, त्याला ताब्यात घेतले आहे. तिकीट घेण्यावरून एका महिला प्रवासी व वाहक यांच्यात वाद झाला. तिला एसटीतून उतरवून देण्यात आले. माझा आईला बसमधून का उतरविले, या कारणावरून कमलेशने चाकुहल्ला केल्याचे चौकशीत पुढे येत आहे.
विजय राठोड,
ठाणेदार, माहुली जहागीर.