१०० दिवसांत २६ कोटी वसुलीचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:59 AM2018-12-23T00:59:56+5:302018-12-23T01:00:19+5:30
यंदाच्या आर्थिक वर्षात महापालिकेची मालमत्ता कराची ४३.२३ कोटींची मागणी असताना २० डिसेंबरपर्यंत १७.५१ कोटींची वसुली झाली आहे. त्यामुळे ३१ मार्च २०१९ पर्यंत म्हणजेच उर्वरित १०० दिवसांत २५.७१ कोटींच्या वसुलीचे आव्हान सध्या महापालिकेसमोर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदाच्या आर्थिक वर्षात महापालिकेची मालमत्ता कराची ४३.२३ कोटींची मागणी असताना २० डिसेंबरपर्यंत १७.५१ कोटींची वसुली झाली आहे. त्यामुळे ३१ मार्च २०१९ पर्यंत म्हणजेच उर्वरित १०० दिवसांत २५.७१ कोटींच्या वसुलीचे आव्हान सध्या महापालिकेसमोर आहे. तूर्तास जीएसटी अनुदानावरच महापालिकेचा आर्थिक डोलारा सुरू आहे.
महापालिकेच्या उत्पन्नाचे पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था व मालमत्ता कर हे दोन प्रमुख व महत्त्वाचे उत्पन्नाचे स्त्रोत होते. मात्र, शासनाने आॅगष्ट २०१५ पासून स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) बंद करून महापालिकांना स्थानिक प्राधिकरणाला भरपाई देणारा महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (जीएसटी) अंतर्गत अनुदान देण्याचे जाहीर केले. या करासह मालमत्ता करावरच महापालिकेचा आर्थिक डोलारा उभा आहे. वास्तविकत: आस्थापना खर्चात झालेली वाढ महापालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत अधिक बळकट करणे महत्त्वाचे झालेले आहे. महापालिकेद्वारा गतवर्षी १.५३ लाखांपैकी १.५२ लाख मालमत्तांचे असेसमेंट केले आहे. अद्याप काही बाकी आहेत. यामधून देखील मालमत्ता उघड होतील, अशी प्रशासनाला आशा आहे.
महापालिकेच्या आर्थिक बजेटनुसार सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात ८१४.१९ कोटींचा एकूण खर्च गृहीत धरण्यात आलेला आहे. यामध्ये महसुली खर्च ३६२.८७ कोटी, भांडवली खर्च ४४०.७० कोटींचा राहणार आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने स्वउत्पन्नातून विकासकामे करणे, ही बाबा दुरापास्त झालेली आहे. महापालिकेच्या मालमत्ता करात नवीन कराची आकारणी करून उत्पन्नवाढ गृहीत धरली असताना मात्र, तसे झालेले नाही. याउलट यामध्ये कमी आलेली आहे. त्यामुळे उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून व याविषयीचे नियोजन करून उत्पन्नाच्या स्त्रोतात वाढ करणे, ही काळाची गरज ठरत आहे.
अशी आहे मालमत्ता कराची मागणी
महापालिकेच्या पाच झोनमध्ये ४३ कोटी २३ लाख ३३ हजार ६४७ रूपयांच्या मालमत्ता कराची मागणी आहे. यामध्ये उत्तर झोनमध्ये ११.८९ कोटी, मध्य झोनमध्ये ११.९५ कोटी, पूर्व झोनमध्ये ४.१२ कोटी, दक्षिण झोनमध्ये ११.९६ कोटी व पश्चिम झोनमध्ये ३.२८ कोटींच्या करांची मागणी आहे. त्या तुलनेत २० डिसेंबरपर्यंत १७.५१ कोटींच्या मालमत्ता कराची वसुली झाली, ही ३२.०४ टक्केवारी आहे. म्हणजेच उर्वरित १०० दिवसांत २५.७२ कोटींच्या वसुलीचे दिव्य महापालिकेला पार पाडावे लागणार आहे.
मालमत्ता कर वसुलीसाठी फिक्स पॉइंटवर सुटीच्या दिवशी शिबिर घेण्यात येत आहेत. सध्या १७.५१ कोटींची वसुली झालेली आहे. ३१ डिसेंबरपूर्वी कराचा भरणा न केल्यास दोन टक्के दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याने त्यापूर्वी नागरिकांनी कराचा भरणा करणे महत्त्वाचे ठरते.
- महेश देशमुख, उपायुक्त, महापालिका