काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसमोर ‘सुवर्णमध्य’ साधण्याचे आव्हान
By admin | Published: March 8, 2016 12:12 AM2016-03-08T00:12:31+5:302016-03-08T00:12:31+5:30
अमरावती महापालिकेची तिजोरी कुणी सांभाळायची, कुठल्या गटाचे नेतृत्व मानणाऱ्यांनी स्वीकारावी, यासाठी मोठा गहजब माजला आहे.
स्थायी समितीचा वाद : खोडके-शेखावतांशी आज चर्चा ?
अमरावती : अमरावती महापालिकेची तिजोरी कुणी सांभाळायची, कुठल्या गटाचे नेतृत्व मानणाऱ्यांनी स्वीकारावी, यासाठी मोठा गहजब माजला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यासमोरही खोडके की शेखावत, हा प्रश्न निर्माण झाला आहे. उभय नेत्यांना सर्वमान्य होईल, असा पर्याय देऊन या वादंगातून सुवर्णमध्य साधण्याचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे. मंगळवार ८ मार्च रोजी या वादावर चर्चा करण्यासाठी प्रदेशाध्यक्षांनी खोडके व रावसाहेब शेखावत यांना मुंबईला बोलावले असल्याची माहिती आहे.
विलास इंगोले यांचा कार्यकाळ संपुष्ठात आल्यावर स्थायी समितीचा पुढील सभापती कुणाचा? ही शेखावत-खोडकेंसाठी प्रतिष्ठेची लढाई ठरली आहे. शेखावत तर करार मानायलाच तयार नाही. खोडके आता काँग्रेसचे नेते असल्याने चार वर्षांपूर्वी झालेला तो करार आताच्या परिस्थितीत निरर्थक असल्याची सबब शेखावत देतात. नेता म्हणून पक्षबदल झाला असेल, तरी राकॉंफ्रंटचे स्वतंत्र अस्तित्व अबाधित असल्याचा दावा खोडके गटाकडून केला जातो. दावे-प्रतिदावे सुरू असताना शेखावतांनी हा मुद्दा थेट प्रदेशाध्यक्षांच्या दालनात पोहोचविला आहे. शेखावत बॅकफुटवर यायला तयार नाहीत तर दुसरीकडे फ्रंटफुटवर खेळण्याचा दीर्घानुभव असलेल्या खोडकेंनी करार पाळण्याचा आग्रह धरला आहे.
जुळवाजुळवीची चाचपणी
१६ सदस्यीय सभागृहात स्थायी समिती सभापतीपद मिळविण्यासाठी ९ सदस्यांची गरज आहे. कॉंग्रेस आणि राकॉंफ्रंटमध्ये एकमत झाल्यास सभापतीपदाची निवड अविरोध होऊ शकते. तूर्तास उभय पक्षातील सुंदोपसुंदी पाहता तसे शक्य दिसत नाही.
स्थायीमधील कुठला सदस्य आपल्या तंबूत येऊ शकतो, याची युध्दस्तरावर चाचपणी सुरू आहे. तिजोरीची चावी आपल्याकडेच रहावी, यासाठी हा सर्व अट्टाहास सुरू आहे. (प्रतिनिधी)
उभय सत्ताकेंद्रातून सरशी कुणाची ?
अमरावती काँग्रेसमध्ये अलिकडे दोन सत्ताकेंद्र झाली आहेत. त्यामुळे ८ मार्चला होणाऱ्या संभाव्य बैठकीत खा. चव्हाण काय निर्णय देतात, तो निर्णय उभय नेत्यांना मान्य होणारा राहिल का? याकडे समस्त नगरसेवकांसह राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे. सभापतीपदावर कॉंग्रेसचे आसिफ तवक्कल की राकॉफ्रंटचा चेहरा? यावर उभय नेत्यांचे प्रादेशिक स्तरावर असलेले ‘वजन’ अमरावतीकरांना ज्ञात होणार आहे.
वडेट्टीवार बुधवारी शहरात
प्रदेशाध्यक्षांनी स्थायी समिती सभापतीपदावर तोडगा काढण्यासाठी निरीक्षक म्हणून आ. विजय वडेट्टीवार यांच्याकडे धुरा दिली आहे. १० मार्चला स्थायी समिती सभापतीची निवड होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार ९ मार्चला शहरात दाखल होणार असल्याची माहिती कॉंग्रेसच्या स्थानिक सूत्रांनी दिली आहे.
अशी होईल निवडणूक
१० फेब्रुवारीला सकाळी ११ वा. महापालिकेतील सुदामकाका देशमुख सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तत्पूर्वी सकाळी ८.३० ते १०.३० पर्यत नामांकन पत्र दाखल करता येणार आहे. त्यानंतर गरज पडल्यास ११ वाजतानंतर निवडणूक होईल.