सुरेखा ठाकरे यांच्या बँक प्रतिनिधी निवडीला आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:17 AM2021-09-16T04:17:49+5:302021-09-16T04:17:49+5:30
बोगस मतदान करून घेतल्याचा आरोप. पराभूत बॅंक प्रतिनिधी मोहन विधळे यांनी, नागपूर येथील सहकार न्यायालयात दिले आव्हान. सुरेखा ठाकरेंची ...
बोगस मतदान करून घेतल्याचा आरोप.
पराभूत बॅंक प्रतिनिधी मोहन विधळे यांनी, नागपूर येथील सहकार न्यायालयात दिले आव्हान.
सुरेखा ठाकरेंची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता
चांदूर बाजार : जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत संचालकपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका नागपूर येथील सहकारी न्यायालयात सादर करण्यात आली आहे. या याचिकेवर २० सप्टेंबरला निर्णय होणार आहे.
चांदूर बाजार तालुक्यातील जवळा शहापूर येथील सेवा सहकारी संस्थेची जिल्हा बँकेवर प्रतिनिधी पाठवण्यासाठी ७ जुलै २०२१ ला ऑनलाईन मतदानाद्वारे निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणूक सुरेखा ठाकरे बँक प्रतिनिधी म्हणून निवडून आल्या होत्या. पराभूत उमेदवार मोहन विधळे यांनी ऑनलाईन निवडणुकीला आधीच विरोध दर्शविला होता. त्यांच्या तक्रारीनुसार, सेवा सहकारी संस्थेचे बहुतांश मतदार हे अशिक्षित आहेत. त्यांना ऑनलाईन मतदान करणे जमणार नाही. त्यामुळे ऑनलाईन मतदान प्रक्रियेत बोगस मतदान होण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा ही निवडणूक संस्थेच्या नेहमीच्या पद्धतीनुसार घेण्यात यावी, याबाबत विधळे यांनी विभागीय निबंधक, जिल्हा निबंधक व सहायक निबंधक यांना लेखी निवेदन दिले होते. परंतु, त्यांच्या निवेदनाची दखल सहकार विभागाने न घेता संस्थेची निवडणूक ऑनलाईन घेतली.
निवडणुकीत संस्थेच्या ७३ सदस्यांनाच मतदानाचा अधिकार होता, तर मतदार यादी ३६२ जणांची होती. मात्र, प्रत्यक्षात ४४५ मतदारांनी मतदान केले. याबाबत पराभूत उमेदवार मोहन विधळे यांनी १० जुलैला जिल्हा सहकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यांची ही तक्रार याचिका न्यायालयात खारीज झाली व सुरेखा ठाकरे यांची निवड कायम ठेवण्यात आली. या निर्णयाविरोधात मोहन विधळे यांनी नागपूर येथील सहकार न्यायालयात आव्हान दिले आहे. याबाबतची सुनावणी पूर्ण झाली असून, २० सप्टेंबरला निर्णय होण्याची शक्यता आहे.
निर्णयाकडे जिल्ह्याचे सहकार क्षेत्राचे लक्ष
मोहन विधळे यांच्या याचिकेवर त्यांच्या वकिलाकडून ९ ऑगस्टला युक्तिवाद करण्यात आला. यानंतर विधळे यांना न्यायालयाने याप्रकरणी अधिक आवश्यक कागदपत्रे १८ सप्टेंबरला सादर करण्यास सांगितले आहे.