जीवनशैली निर्देशांकातील मानांकन टिकविण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 10:37 PM2019-02-12T22:37:44+5:302019-02-12T22:38:22+5:30

केंद्र शासनाने देशात ११६ व राज्यात १२ शहरातील नागरिकांच्या जीवनशैलीच्या अनुषंगाने शहरी राहणीमान निर्देशांक कार्यक्रम राबविला. यामध्ये पुणे, मुंबईच्या पाठोपाठ अमरावतीचा पाचवा क्रमांक आला. ही बाब अमरावतीकर म्हणून गौरवाची असली तरी हा क्रमांक टिकवून ठेवणे, किंबहुना यापेक्षा अधिक पुढे जाणे हे आव्हान समोर आहे. दरवर्षी असणारा हा उपक्रम पुन्हा एप्रिलपासून सुरू होणार आहे.

Challenge of Maintaining the Lifestyle Index Rankings | जीवनशैली निर्देशांकातील मानांकन टिकविण्याचे आव्हान

जीवनशैली निर्देशांकातील मानांकन टिकविण्याचे आव्हान

Next
ठळक मुद्देशहर राज्यात पाचवे, देशात सोळावे : केंद्र शासनाच्या गृहनिर्माण मंत्रालयाचा उपक्रम, यंदा एप्रिलपासून सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : केंद्र शासनाने देशात ११६ व राज्यात १२ शहरातील नागरिकांच्या जीवनशैलीच्या अनुषंगाने शहरी राहणीमान निर्देशांक कार्यक्रम राबविला. यामध्ये पुणे, मुंबईच्या पाठोपाठ अमरावतीचा पाचवा क्रमांक आला. ही बाब अमरावतीकर म्हणून गौरवाची असली तरी हा क्रमांक टिकवून ठेवणे, किंबहुना यापेक्षा अधिक पुढे जाणे हे आव्हान समोर आहे. दरवर्षी असणारा हा उपक्रम पुन्हा एप्रिलपासून सुरू होणार आहे.
केंद्रीय शहरी गृहनिर्माण व शहरी मंत्रालयाच्यावतीने मागील वर्षी राज्यासह देशातील शहरी राहणीमानविषयक माहिती जाणून घेण्यात आली. यामध्ये एकूण ७९ निर्देशांकाच्या अनुषंगाने ही माहिती विहिद कालावधीत पूर्ण करण्याचे कसब या उपक्रमाच्या शहर समन्वयक डॉ. श्वेता बोके यांनी दाखविल्याने अमरावतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. केंद्रीय मंत्रालयाच्यावतीने राज्यातील मार्केट रिसर्चकरिता ‘इन्फॉस’ या संस्थेची निवड करण्यात आली. या उपक्रमांतर्गत शहरी राहणीमानाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक बाबीचे बारकार्ईने निरीक्षण व परीक्षण करण्यात आले. प्रत्येक बाबीचे अ‍ॅपद्वारे आॅडिट व जिओ टॅगिंग करण्यात आले. राज्यातील १२ व देशातील ११६ शहरामधील नागरिकांच्या राहणीमानाशी त्याची गुणात्मक तुलना करण्यात आली. यामध्ये अमरावती शहराला हे गुणात्मक मानांकन मिळाले आहे.
जीवनशैली निर्देशांकात इंस्टिट्यूशनल, सोशल, इकॉनॉमी व फिजीकल हे प्रामुख्याने चार निर्देशांक होते. यामध्ये जवळपास ७९ उपनिर्देशांकावर आधारित गुणात्मक मानांकन करण्यात आले. यामध्ये इंस्टिट्यूशनलला २५ गुण, सोशलला २५, इकॉनॉमीला ५, तर फिजीकल ४५ असे १०० गुण होते. यामध्ये अमरावतीने ४६.५७ गुण मिळवून राज्यात पाचवे व देशात १६ वे स्थान मिळविले. सन २०१९-२०२० करिता पुन्हा एप्रिलपासून हा उपक्रम सुरू होणार आहे. यासाठी नुकतेच पत्र प्राप्त झाले आहे. महापालिका आयुक्तांची भूमिका सकारात्मक असल्यामुळे यावर्षीदेखील अमरावती ही पहिल्या पाच शहरामध्ये मानांकन मिळेल, असा विश्वास डॉ. श्वेता बोके यांनी व्यक्त केला. या सर्वेक्षणाचा अहवाल पुस्तिकेच्या स्वरूपात केंद्र शासनाला सादर झालेला असल्याने प्रत्येक शहराकडून आलेल्या अहवालावरून कोणत्या शहरासाठी कशाचे नियोजन हवे, याचा प्राधान्यक्रम ठरविण्यात येणार आहे आणि त्यानुसार केंद्र शासनाकडून त्याप्रमाणे निधी व योजना देण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.
या मापदंडावर जीवनशैैली निर्देशांकाची निश्चिती
केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व जीवनशैली मंत्रालयाद्वारे आयोजित जीवनशैली निर्देशांकात अमरावती शहराची सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सुरक्षितता, अर्थव्यवस्था, रोजगाराच्या संधी, सार्वजनिक मैदाने, जमिनींचा वापर, ऊर्जा व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, प्रदूषण स्थान, स्थिरता, आरोग्य सेवा, पर्यावरण, वीज कंपनी, सिंचन, परिवहन, राज्य विक्रीकर, बांधकाम, हॉटेल आणि इतर पायाभूत सुविधांचे सर्वेक्षण करून मापदंडानुसार जीवनशैली निर्देशांक मिळाला. आता मात्र हे मानांकन टिकविण्याचे आव्हान अमरावतीकरांसमोर आहे.
पंधरा मुद्द्यांवर झाली शहराची पाहणी
शहरातील नागरिकांच्या जीवनशैलीशी निगडित महापालिकेने पुरविलेल्या सुविधादेखील या उपक्रमात थर्ड पार्टी आॅडिटद्वारा अभ्यासण्यात आल्यात. यामध्ये स्थापत्य, विद्युत, आरोग्य, वैद्यकीय, बांधकाम, मिळकत कर, पाणीपुरवठा, नागरी वस्ती, या सर्व विभागांसह रेल्वे, एसटी, पीएमपीएल, महावितरण, आरटीओ व शैक्षणिक संस्था अशा एकूण १८ विभागांतील माहिती एकत्रित करण्यात आली. यासाठी नियुक्त कोअर कमिटीद्वारे महत्त्वाच्या व कमी महत्त्वाच्या अशा एकूण १५ मुद्द्यांवर शहराची पाहणी करण्यात आली. यामध्ये राज्यातील १२ शहराच्या तुलनेत अमरावतीने बाजी मारली.
असे राहीले अमरावतीचे मानांकन
या जीवनशैली निर्देशांकात अमरावतीतील ४६.५७ गुण मिळून राज्यात पाचवे स्थान मिळाले. यामध्ये ५८.११ गुणांसह पुणे प्रथम, ५८.०२ गुणांसह नवी मुंबई द्वितीय, ५७.७८ गुणांसह ग्रेटर मुंबई तृतीय व ५२.१७ गुणांसह ठाणे चवथ्या क्रमांकावर आहे. देशपातळीवरील रँकिंगमध्ये अमरावती १६ व्या, नाशिक ४४.५७ गुणांसह २१ व्या, तर ४०.०१ गुणांसह नागपूर शहर ३१ व्या स्थानावर आहे.

Web Title: Challenge of Maintaining the Lifestyle Index Rankings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.