नालेसफाईचे आव्हान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 11:15 PM2018-06-10T23:15:44+5:302018-06-10T23:15:57+5:30
पावसाळ्यात शहरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये, नदी-नाल्याचे पाणी वस्त्यात शिरू नये, यासाठी महापालिकेने नालेसफाई मोहीम सुरू केली आहे. काही दिवसांपासून महापालिकेची यंत्रणा मान्सूनपूर्व तयारीला लागली असली तरी अद्यापपर्यंत ७० ते ७५ टक्केच काम झाल्याने संपूर्ण नालेसफाईचे आव्हान प्रशासनासमक्ष उभे ठाकले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पावसाळ्यात शहरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये, नदी-नाल्याचे पाणी वस्त्यात शिरू नये, यासाठी महापालिकेने नालेसफाई मोहीम सुरू केली आहे. काही दिवसांपासून महापालिकेची यंत्रणा मान्सूनपूर्व तयारीला लागली असली तरी अद्यापपर्यंत ७० ते ७५ टक्केच काम झाल्याने संपूर्ण नालेसफाईचे आव्हान प्रशासनासमक्ष उभे ठाकले आहे. आगामी दिवसांत दमदार पाऊस आल्यास महापालिकेच्या नालेसफाईची लक्तरे वेशीवर टांगली जाण्याची भीती व्यक्त होत आहे. मान्सून सुरू होऊन दोन दिवस उलटले असताना महापालिकेकडून मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम सुरुच आहे.
मनपाक्षेत्रातील १८ मुख्य व १९ उपनाल्यांसह छोटे नाले व अन्य नालेसफाईसाठी प्रशासनाने ७ जूनची डेडलाईन दिली होती. मोठे नाले व उपनाल्यांची स्वच्छता यंत्रसामग्रीने केली जात असल्याने ती जबाबदारी अतिक्रमण विभागाकडे देण्यात आली तर प्रभागातील तुंबलेल्या नाल्या व अन्य ठिकाणची स्वच्छता करण्याची जबाबदारी स्वच्छता विभागाकडे देण्यात आली. मात्र, ९ जूनपर्यंत नालेसफाईचे काम ७५ टक्यांपर्यंतच झाल्याची कबुली स्वच्छता व अतिक्रमण निर्मूलन विभागाने दिली आहे. त्यामुळे येत्या एक दोन दिवसांत मोठा पाऊ स झाल्यास पावसाचे पाणी वस्त्यांत शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. नालेसफाईची कुर्मगती पाहता प्रशासनाने अधिनिस्थ यंत्रणेला पुन्हा ११ जूनची डेडलाईन देण्यात आली आहे. रविवार व सोमवार अशा दोन दिवसांत शहरातील उर्वरित २५ टक्के नाल्यांची संपूर्ण स्वच्छता करण्याचे आव्हान अतिक्रमण व स्वच्छता विभागाला पेलायचे आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या माहितीनुसार, १८ मोठ्या नाल्यांपैकी १३ व १९ छोट्या नाल्यांपैकी १४ नाल्यांची स्वच्छता करण्यात आली. जेसीबी आणि पोकलॅन्ड या यंत्रणेद्वारा ही स्वच्छता करण्यात आल्याचा दावाही महापालिका प्रशासनाने केला आहे. विधानपरिषदेची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर नालेसफाईची कामे हाती घेण्यात आली आहे. मात्र, ते अद्यापही पूर्ण करण्यात महापालिकेला यश आलेले नाही. शहरातील अनेक भागांमधील गटारींची साफसफाई झालेली नाही, तर काही नाल्यांमधील घाण बाजूलाच टाकून दिली जात आहे. अंबादेवी संस्थानलगत वाहणाऱ्या अंबानाल्याची सफाई अद्यापही न झाल्याने यंदाही पावसाचे पाणी तुंबण्याचा योग नाकारता येत नाही. बांधकाम विभागाच्या कृपेने यंदाही पिल्लरला अडकलेला कचरा ‘जैसे थे’ आहे. गतवर्षी पावसाचे पाणी घरात शिरून नमुना भागातील रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. त्या बाबीपासून धडा घेऊन अंबानाल्यातील अनावश्यक पिल्लर पाडण्याचे काम महापालिकेला करायचे होते. तसा अहवालही नागपूरच्या व्हीएनआयटीने दिला होता. मात्र, त्या अहवालानुसार कुठलीही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदाही अंबादेवीलगतच्या नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नाल्यातील
मलमा नाल्यातच
महापालिका क्षेत्रातील ज्या मोठ्या व लहान नाल्यांमधील गाळ काढण्यात येऊन नाला साफ करण्याचा दावा करण्यात येत आहे, त्यापैकी अनेक नाल्यातील मलबा काढून तो त्याच नाल्याच्या काठावर टाकण्याचा प्रताप काही कंत्राटदारांनी केला आहे. प्रशांतनगर भागातून जाणारा नाला स्वच्छ करण्यात आला असला तरी त्यातील मलबा नाल्याच्या दुसºया बाजूला टाकण्यात आल्याने तो मलबा एकाच पावसात त्याच नाल्यात पडून पुन्हा नाला ‘चोकअप’ होण्याची भीती आहे. नाल्यातील मलमा नाल्याच्या दुसºया बाजूने टाकणाºया कंत्राटदारांवर महापालिकेने कुठलीही कारवाई केलेली नाही, हे विशेष.