चार लाख क्विंटल तूर खरेदीचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:07 AM2017-07-25T00:07:28+5:302017-07-25T00:07:28+5:30
टोकन दिलेल्या शेतकऱ्यांच्या घरी पडून असलेली तूर बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत खरेदी करण्याचा निर्णय शासनाने २१ जुलै रोजी घेतला.
३१ जुलै ‘डेडलाईन’: रविवारी फक्त दोन हजार क्विंटल खरेदी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : टोकन दिलेल्या शेतकऱ्यांच्या घरी पडून असलेली तूर बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत खरेदी करण्याचा निर्णय शासनाने २१ जुलै रोजी घेतला. जिल्ह्यात एकूण चार लाख १६ हजार क्विंटल तुरीची खरेदी होणार आहे. मात्र यंत्रणांव्दारा रोज १५ हजार क्विंटलपेक्षा अधिक तुरीची खरेदी आजवर झाली नसल्याने ३१ जुलै या ‘डेडलाईन"च्या आत एवढी तूर खरेदी करणे जिल्हा प्रशासनासमोर आव्हान आहे.
यासंदर्भात पालकमंत्र्यांनी शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांसी चर्चा करून लगेचच केंद्रांवर तूर खरेदी सुरू करण्याच्या सूचना दिल्यात, त्यानुसार रविवारी तीन केंद्रांवर दोन हजार ६६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. यामध्ये अचलपूर केंद्रावर सहा शेतकऱ्यांची १२३ क्विंटल, अमरावतीला ५९ शेतकऱ्यांची एक हजार ६६८ क्विंटल व चांदूरबाजार केंद्रावर चार शेतकऱ्यांची २७४ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. अद्याप १८ हजार ५७६ शेतकऱ्यांची चार लाख १४ हजार क्विंटल तूर खरेदी बाकी आहे.
आजवर यंत्रनांव्दारा १० ते १५ हजार क्विंटलपेक्षा अधिक तुरीची खरेदी करण्यात आली नसल्याने ३१ जुलै या अंतिम मुदतीच्या आत चार लाख क्विंटल तूर खरेदी करणे हे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. यामध्येदेखील २७ जुलै रोजी नागपंचमी असल्याने जिल्ह्यातील सर्व तूर खरेदी केंद्र बंद राहणार आहे. रविवारी तीन केंद्र सुरू करण्यात आल्यावर सोमवारी धारणी वगळता उर्वरित नऊ केंद्रांवर तूर खरेदी सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे व डीएमओ अशोक देशमुख यांनी दिली.
तुरीत आर्द्रता
असल्यास कमी भाव
सद्या पावसाळी वातावरण आहे. त्यामुळे तुरीच्या साठ्यात एफएक्यू निकषापेक्षा जास्त आर्द्रता असल्यास हमी भावाच्या किंमतीत आर्द्रतेच्या प्रमाणानुसार भावात कमी-जास्त ग्रेडरच्या सल्लयानेने करण्यात येणार आहे.व्यापाऱ्यांव्दारा शेतकऱ्यांच्या नावावर तूर विकण्याचा प्रकार झाल्यास त्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.