२४ दिवसांत १६ कोटी वसुलीचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 10:17 PM2019-03-06T22:17:34+5:302019-03-06T22:17:56+5:30
यंदाच्या आर्थिक वर्षात महापालिकेचा मालमत्ता कराची ४३.२३ कोटींची मागणी असताना २ मार्चपर्यंत २७.४० कोटींची वसुली झालेली आहे. ही ६३.५२ टक्केवारी आहे. त्यामुळे ३१ मार्च २०१९ पर्यंत उर्वरित २४ दिवसांत १५.७६ कोटींच्या वसुलीचे आव्हान सध्या महापालिकेसमोर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदाच्या आर्थिक वर्षात महापालिकेचा मालमत्ता कराची ४३.२३ कोटींची मागणी असताना २ मार्चपर्यंत २७.४० कोटींची वसुली झालेली आहे. ही ६३.५२ टक्केवारी आहे. त्यामुळे ३१ मार्च २०१९ पर्यंत उर्वरित २४ दिवसांत १५.७६ कोटींच्या वसुलीचे आव्हान सध्या महापालिकेसमोर आहे.
मालमत्ता करांची वसुली अधिक होण्याच्या दृष्टीने कर विभागाने कडक धोरणाचा अवलंब केला आहे. यामध्ये एक लाखांवर करवसुली थकीत ५७ थकबाकीदारांना जप्ती नोटीस बजावली. या थकबाकीदारांकडे सध्या ८१ लाख १७ हजार ५४८ रुपयांची वसुली बाकी आहे. आयुक्तांचे आदेशानुसार ३६ मालमत्ताचे लिलाव ८ मार्चला होईल.
महापालिकेच्या आर्थिक बजेटनुसार सन २०१९-२० या आर्थिक वर्षात ९५० कोटींचा एकूण खर्च गृहीत धरण्यात आलेला आहे. यामध्ये महसुली खर्च ३६१ कोटी, भांडवली खर्च ४४१ कोटींचा राहणार आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती हलाकीची असल्याने स्वउत्पन्नातून विकास कामे करणे ही बाब दुरापास्त झालेली आहे. महापालिकेच्या मालमत्ता करात नवीन कराची आकारणी करून उत्पन्नवाढ गृहीत धरली असताना मात्र, तसे झालेले नाही. याउलट यामध्ये कमी आलेली आहे. त्यामुळे उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून व याविषयीचे नियोजन करून उत्पन्नाचे स्त्रोतात वाढ करणे ही काळाची गरज ठरत आहे.
अशी आहे मालमत्ता कराची मागणी
महापालिकेच्या पाच झोनमध्ये ४३ कोटी २३ लाख ३३ हजार ६४७ रूपयांच्या मालमत्ता कराची मागणी आहे. यामध्ये उत्तर झोनमध्ये ११.८९ कोटी, मध्य झोनमध्ये ११.९५ कोटी, पूर्व झोनमध्ये ४.१२ कोटी, दक्षिण झोनमध्ये ११.९६ कोटी व पश्चिम झोनमध्ये ३.२८ कोटींच्या करांची मागणी आहे. त्या तुलनेत २० डिसेंबरपर्यंत १७.५१ कोटींच्या मालमत्ता कराची वसुली झाली, ही ३२.०४ टक्केवारी आहे. उर्वरित १०० दिवसांत २५.७२ कोटींच्या वसुलीचे दिव्य महापालिकेला पार पाडावे लागतील.
सध्या २७.४६ कोटींची वसुली झाली आहे. आता ३६ मालमत्ताचा लिलाव करण्यात येणार आहे. थकबाकी असणाऱ्या ५६ मालमत्ताधारकांना जप्तीनामा बजावले.
- महेश देशमुख,
उपायुक्त, महापालिका