भ्रष्ट साखळीला ‘ब्रेक’ लावण्याचे आव्हान !
By admin | Published: February 20, 2017 12:04 AM2017-02-20T00:04:55+5:302017-02-20T00:04:55+5:30
ऐन निवडणुकीच्या काळात बदल्यांचे आदेश काढत महापालिका आयुक्तांनी निवडक कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय दंडुका उगारण्याचे धाडस दाखविले आहे.
महापालिका आयुक्तांचा लक्ष्यवेध : आदेश न पाळणाऱ्यांविरूद्ध होणार का शिस्तभंग?
अमरावती : ऐन निवडणुकीच्या काळात बदल्यांचे आदेश काढत महापालिका आयुक्तांनी निवडक कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय दंडुका उगारण्याचे धाडस दाखविले आहे. वसुली आणि अन्य विभागातील साखळी तोडण्यासाठी हा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. तथापि बदली आदेशाला न जुमानता बदलीच्या ठिकाणी न जाण्याचा शिरस्ता बहुतांश कर्मचाऱ्यांनी कायम ठेवल्याने आयुक्त हेमंत पवार ‘त्या’ कर्मचाऱ्यांवर नेमकी कुठली कारवाई करतात, याकडे संपूर्ण महापालिका वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
आयुक्तांच्या आदेशाला न जुमानता केराची टोपली दाखविण्याच्या परंपरेला छेद देण्याची, तद्वतच पालिकेतील भ्रष्ट साखळीला ‘ब्रेक’ लावण्याचे आव्हान आयुक्तांसमोर उभे ठाकले आहे.
महापालिका वयाच्या पंचविशीत येत असताना तिला टक्केवारीचे ग्रहण लागले आहे. महापालिकेतील बहुतांश फाईल्सवर ‘वजन’ ठेवल्याशिवाय त्या पुढेच सरकत नसल्याचे उघड वास्तव आहे. अनेक कंत्राटदार स्वत:च कामाच्या फाईल्स घेऊन महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी घेऊन देयके काढून घेत असतात. महापालिकेच्या अनेक महत्त्वाच्या फाईल्स खासगी व्यक्ती हाताळतात. ही बाब महापालिकेसाठी नवीन नाही. साफसफाईच्या देयकावर ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षकांच्या बनावट स्वाक्षरीचे प्रकरण अगदी ताजे आहे. महापालिकेतील बहुतांश विभागात टक्केवारीची बजबजबपुरी माजली असताना बदली प्रक्रियेत सुद्धा प्रचंड अर्थकारण शिरल्याची साधार भीती व्यक्त केली जात आहे. आयुक्त २२ कर्मचाऱ्यांची बदली करतात काय आणि त्यातील एखाद दुसरा अपवाद वगळता उर्वरित कर्मचारी ते बदली आदेश झुगारुन टाकतात काय, हा प्रकार प्रशासकीय हडेलहप्पीपणाचे द्योतक ठरले आहे. प्रसंगी प्रशासकीय प्रमुख असलेल्या आयुक्तांच्या आदेशाला आव्हान देऊन खुर्ची न सोडण्याची मानसिकता त्यातून प्रतिबिंबित होते.
बदली आदेश आणि कारणे दाखवा नोटीस बजावूनही बदली झालेल्या ठिकाणी अनेक कर्मचारी रूजू होत नाहीत.
त्या ‘चिपकुं’ची यादी तयार
महापालिकेत वर्षोनुवर्षे एकाच खुर्चीला चिटकून राहणाऱ्यांची यादी तयार करण्यात आल्याची माहिती आहे. त्यापार्श्वभूमीवर एकाच ठिकाणी राहून आर्थिक साखळी ‘बळकट’ करणाऱ्यांचा खांदेपालट करण्याचे संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहेत. निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर ही बदली प्रक्रिया राबविली जाईल.९ फेब्रुवारीला आयुक्तांनी काढलेले बदली आदेश मार्चच्या पहिल्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात अपेक्षित असलेल्या बदलीआदेशांची रंगीत तालीम ठरले आहेत.
यांचा असेल समावेश !
पाच ते तब्बल २७ वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसणाऱ्यांमध्ये लेखा विभागातील २, जीएडीतील ३, बांधकाम विभागातील १ ,अतिक्रमण विभाग,आरोग्य आणि उद्यान विभागातील प्रत्येकी एका कर्मचाऱ्याचा समावेश असण्याचे संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहेत. राजकीय दबावतंत्राला जुमानता ही बदली प्रक्रिया राबविली जाईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर सांगितले. २२ जणांच्या बदलीप्रक्रियेनंतर झालेली ओरड पाहता आयुक्त, उपायुक्त आणि महापौरांकडील कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रशासनाच्या विचाराधीन आहेत.