सहा शाळांसमोर पटसंख्या टिकविण्याचे आव्हान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 09:51 PM2018-09-17T21:51:31+5:302018-09-17T21:52:00+5:30

गतवर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थीसंख्येत झालेली लक्षणीय घट आणि त्याकडे प्रशासनाने केलेले दुर्लक्ष पाहता महापालिका शाळांच्या अस्तिवावरच प्रश्नचिन्ह लागले आहे. गतवर्षीची पटसंख्या टिकवता न आल्याने अंबिकानगरातील हिंदी प्राथमिक शाळा समायोजित करण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर ओढविली आहे.

Challenges to maintain six schools in front! | सहा शाळांसमोर पटसंख्या टिकविण्याचे आव्हान !

सहा शाळांसमोर पटसंख्या टिकविण्याचे आव्हान !

googlenewsNext
ठळक मुद्देशिक्षण विभागात लपवाछपवी : शिक्षणाधिकारी देतील का लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गतवर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थीसंख्येत झालेली लक्षणीय घट आणि त्याकडे प्रशासनाने केलेले दुर्लक्ष पाहता महापालिका शाळांच्या अस्तिवावरच प्रश्नचिन्ह लागले आहे. गतवर्षीची पटसंख्या टिकवता न आल्याने अंबिकानगरातील हिंदी प्राथमिक शाळा समायोजित करण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर ओढविली आहे. अन्य सहा शाळांमधील विद्यार्थी अन्य शाळांमध्ये हलविण्याची टांगती तलवार आहे. पुढील वर्षी या सहा शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश करवून त्या बंद होऊ न देण्याचे आव्हान शिक्षक व प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
महापालिकेच्या शिक्षण विभाग कार्यालयातून प्राप्त माहितीनुसार, ६४ शाळांमध्ये तूर्तास ८७०८ विद्यार्थी शिकत आहेत. पहिली ते पाचवीत ६००३ तर सहावी ते आठवीत २७०५ विद्यार्थी असल्याची नोंद शिक्षण विभागाकडे आहे. मात्र, ६४ शाळांपैकी अंबिकानगर येथील हिंदी माध्यमाची शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद आहे. मात्र तेथील शिक्षक अतिरिक्त ठरू नयेत, यासाठी ती शाळा कागदोपत्री जिवंत दाखविण्यात आली आहे. पवित्र पोर्टल, सरल प्रणाली व संचमान्यतेमध्ये एकही विद्यार्थीसंख्या नसलेल्या शाळांचा समावेश झाला आहे. प्रशासकीय अपयश लपविण्यासाठी या शाळेचे अस्तित्व कायम राखून ती समायोजित केल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली. याखेरीज नेहरू मैदानस्थित मुलांची हिंदी माध्यमाच्या शाळेतील पाचव्या वर्गात केवळ ३ विद्यार्थी आहेत. या शाळेतील विद्यार्थी नजीकच्या अन्य शाळांत स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती आहे. तेथीलच मुलांच्या मराठी माध्यमाच्या शाळेतील इयत्ता पाचवीत केवळ आठ विद्यार्थी आहेत. ही शाळासुद्धा अन्य शाळेत ‘वर्ग’ करण्यात येणार आहे. अंबिकानगरस्थित मनपा प्राथमिक शाळा क्रमांक १६ मध्ये पाच वर्ग मिळून केवळ ७ विद्यार्थी आहेत. त्यात पहिली, दुसरी व तिसरीत प्रत्येकी एक व चौथी व पाचवीत प्रत्येकी दोन विद्यार्थी आहेत. तेथील हिंदी प्राथमिक शाळा आधीच बंद आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थी नजीकच्या शाळेत हलविण्याची शक्यता नाकारता येत नाही. बजरंग प्लॉटस्थित हिंदी प्राथमिक शाळा क्रमांक ८ मध्ये पहिलीत ३, दुसरीत ५, तिसरीत ४, चौथीत २ व पाचवीत केवळ ३ विद्यार्थी आहेत. अकोली स्थित शाळेत पाच वर्ग मिळून केवळ १९ व नमुना स्थित शाळेत पाच वर्ग मिळून २० विद्यार्थी आहेत. या सहाही शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरू नयेत, त्यांच्या समायोजनाचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने यंदा तेथील विद्यार्थी अन्य मोठ्या शाळेत स्थलांतरित केले नाहीत. मात्र, पुढील शैक्षणिक सत्रात ती पटसंख्या यंदापेक्षा खाली आल्यास ते वर्ग बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाला घ्यावा लागणार आहे. त्यामुळे महापालिका शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढीस लागण्यासाठी आतापासूनच प्रभावी उपयायोजना व नियोजनाची गरज निर्माण झाली आहे.
दत्तक शाळांना लाभ काय?
महापालिका शाळांचा शैक्षणिक व भौतिक दर्जा उंचावण्यासाठी गतवर्षी काही शाळा सामाजिक तथा स्वयंसेवी संस्थांना दत्तक देण्यात आल्या. दत्तक म्हणून त्या संस्थेने या शाळेचा शैक्षणिक व भौतिक दर्जा सुधारण्यासाठी नेमके काय केले, याबाबत शिक्षण विभागाकडे वस्तुनिष्ट माहिती उपलब्ध नाही. प्रत्यक्षात काही शाळांना भेटी दिल्या असता संबंधित संस्थेच्या नामफलकाखेरीज आम्हाला काहीही मिळाले नसल्याची माहिती तेथील शिक्षकांनी नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर दिली.
शिक्षणाधिकाऱ्यांनी घालावे लक्ष
तीन वर्षांनंतर चालू शैक्षणिक वर्षात नागपूर जिल्हापरिषदेत काम केलेले अनुभवी अनिल कोल्हे यांची महापालिकेत शिक्षणाधिकारी म्हणून पदस्थापना झाली. मनपा शाळांची पटसंख्या ११ हजारांहून ८ हजारांवर स्थिरावत असेल तर किमान ती पटसंख्या कायम ठेवून आहे त्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे.

Web Title: Challenges to maintain six schools in front!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.