वनविभागातूनच चंदनाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 12:12 AM2017-11-26T00:12:59+5:302017-11-26T00:13:10+5:30
वनसंवर्धनाची जबाबदारी सांभाळणाºया वनविभागाच्या कार्यालयाच्या आवारातूनच चंदनाचे वृक्ष चोरी गेल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी समोर आला.
ऑनलाईन लोकमत
अमरावती : वनसंवर्धनाची जबाबदारी सांभाळणाºया वनविभागाच्या कार्यालयाच्या आवारातूनच चंदनाचे वृक्ष चोरी गेल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी समोर आला. याप्रकरणात झोपा काढणाºया दोन चौकीदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, गाडगेनगर पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे.
कॅम्प रोड स्थित व्याघ्र प्रकल्प व अमरावती वनविभाग हे दोन कार्यालये आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक रेड्डी व अमरावती वनविभागाचे उपवनसरंक्षक हेमंत मिणा यांचा कक्ष आहे. या कार्यालयाच्या समोरील खुल्या आवारात विविध प्रजातींचे वृक्ष असून शुक्रवारी सकाळी दोन चौकीदारांना चंदनाचा वृक्ष कापून नेल्याचे निदर्शनास आले. या घटनेच्या माहितीवरून वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी पी.व्ही. पडगव्हाणकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यामध्ये ट्री-गार्डमधील चंदनाच्या वृक्षाचा ५६ सेमी व ५ फूट उंचीचा भाग कापून चोरून नेल्याचे निदर्शनास आले. वनाधिकारीने ट्री-गार्डजवळ पडलेले चंदनाचे चार नग जप्त केले. या घटनेची तक्रार त्यांनी गाडगेनगर पोलिस ठाण्यात नोंदविली आहे. या वनविभाग कार्यालयात दोन चौकीदार कार्यरत असतानाही चंदनाचे वृक्ष कापून नेण्याची मजाल चोरांनी दाखविली, हे विशेष.
सीईओच्या बंगल्यावरूनही वृक्ष चोरी
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अभियंत्यांच्या कांतानगरातील बंगल्याच्या आवारातून चंदनाचे वृक्ष चोराने कापून नेले. यापूर्वी विभागीय आयुक्त व न्यायाधीश यांच्या बंगल्यावरील वृक्ष चोरण्यात आले होते. अनेक वर्षांपासून चोरीचे सत्र सुरू असतानाही अद्याप चंदनचोर पोलिसांच्या हाती लागले नाही.