अमरावतीकरांनी अनुभवले चंद्राचे सप्तरंगी वलय
By admin | Published: March 30, 2015 12:16 AM2015-03-30T00:16:35+5:302015-03-30T00:16:35+5:30
पावसाळ्यात इंद्रधनुष्याचे सप्तरंगी वलय आकाशात नेहमीच दिसते.
अमरावती : पावसाळ्यात इंद्रधनुष्याचे सप्तरंगी वलय आकाशात नेहमीच दिसते. मात्र, चंद्राभोवती सप्तरंगी वलयाचे दर्शन अमरावतीकरांना २७ मार्चला रात्री ८ ते ८.३० वाजेपर्यंत झाले. अनेक खगोलप्रेमींनी व जिज्ञासूंनी हे वलय मोठ्या कुतुहलाने पाहीले. हे वलय तिवसा, गुरुकुंज मोझरी येथून सुध्दा सुंदर दिसले असल्याचे जिज्ञासूंनी फोन करुन कळविले.
सप्तरंगी वलयाला ‘चंद्राचे खळे’सुध्दा म्हणतात. आकाशात अति उंचावर अनेक वेळा विरळ ढग निर्माण होतात. त्यामध्ये असंख्य बर्फाचे स्फटिक असतात. त्यांचा आकार षटकोनी असून अपवर्तन कोन ६० अंशाचा असतो. प्रकाशाचे किरण स्फटिकामधून जावू लागले की ते मूळ दिशेपासून विचलित होतात व सप्तरंगी वलय दिसते. बर्फाच्या षट्कोनी स्फटिकामुळे निर्माण होणारा न्युनतम विचलन कोन २२ अंश असतो हिच तेजोवलयाची कोनीय त्रिज्या असते. चंद्र हा केंद्रबिंदू धरुन २२ अंशाच्या कोनीय व्यासाचे वर्तुळ हिच तेजोवलयाची व्याप्त असते. बऱ्याच वेळा या खळ्यांचा अशुभ गोष्टींशी संबंध लावला जातो पण त्यात तथ्य नाही, अशी माहिती खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली.