चांदूर रेल्वे शहरात मतदार यादीत दुबार नावे असणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:09 AM2021-06-27T04:09:41+5:302021-06-27T04:09:41+5:30
चांदूर रेल्वे : शहरातील मतदार यादीत दुबार किंवा तिबार नावे असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी आम आदमी पार्टीतर्फे ...
चांदूर रेल्वे : शहरातील मतदार यादीत दुबार किंवा तिबार नावे असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी आम आदमी पार्टीतर्फे तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी राजेंद्र इंगळे यांना निवेदनतून केली आहे.
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने चांदूर रेल्वे शहरातील मतदारांची यादी अपडेट करणे सुरू आहे. सध्या ज्यांचे छायाचित्र नाही, अशांची नावे वगळण्यात येणार आहेत. मात्र, चांदूर रेल्वे नगरपरिषद हद्दीत बाहेरगावी राहत असलेल्या मतदारांची नावे जाणीवपूर्वक यादीत नावे नोंदविली आहे. त्यामुळे शहरवासीयांना निवडणुकीचे भविष्य ठरविता येत नाही. सदर मतदार हे शहर व ग्रामीण भागात दोन्हीकडे मतदान करीत असल्याचे आम आदमी पार्टीचे म्हणणे आहे. दोन ठिकाणी मतदार यादीत नाव असणे, हा संवैधानिक गुन्हा आहे. अशा लोकांची शहानिशा करून गुन्हा नोंदवावा, अशी मागणी आपचे पश्चिम विदर्भ संघटनमंत्री नितीन गवळी व माजी नगर परिषद सभापती महमूद हुसेन यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन केली आहे.
बॉक्स
शहरात तीन हजार बोगस मतदार - नितीन गवळी
चांदूर रेल्वे नगर परिषद हद्दीतील मतदार यादीत तब्बल तीन ते साडेतीन हजार दुबार / तिबार मतदारांची नावे आहेत. सदर नावे त्वरित वगळण्यात यावी. निवडणुकीच्या वेळी बोगस मतदारांची नावे कायम दिसल्यास निवडणुका रद्द करण्याची मागणी करणार असल्याचे आम आदमी पार्टीचे नेते नितीन गवळी यांनी सांगितले.