चांदूरच्या १७ बाजार समिती संचालकांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 10:06 PM2018-06-27T22:06:54+5:302018-06-27T22:07:08+5:30
येथील बाजार समितीच्या आवारातून अवैध जनावरांची वाहतूक होत असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आल्यानंतर बुधवारी अचानक झालेल्या घडामोडीत १७ संचालकांना चौकशीकरिता बोलावून पोलिसांनी त्यांना अटक केली. याप्रकरणी एकूण २१ संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : येथील बाजार समितीच्या आवारातून अवैध जनावरांची वाहतूक होत असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आल्यानंतर बुधवारी अचानक झालेल्या घडामोडीत १७ संचालकांना चौकशीकरिता बोलावून पोलिसांनी त्यांना अटक केली. याप्रकरणी एकूण २१ संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
स्थानिक बाजार समितीच्या आवारातील अवैध जनावरांचे वाहतूक प्रकरण ११ जून रोजी उघडकीस आले होते. या प्रकरणात पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू होती. पहिल्याच दिवशी सहा आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर सचिवांवरही कारवाई झाली. बुधवार, २७ जून रोजी संचालक मंडळाची पुन्हा चौकशी करण्यात आली. ही चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केली. त्यानंतर बाजार समितीच्या २१ संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पैकी १७ संचालकांना तातडीने अटक करण्यात आली आहे.
एसडीपीओ जयंत मिणा यांनी सर्व संचालकांना सकाळी ९ वाजता स्थानिक पोलीस ठाण्यात चौकशीकरिता हजर राहण्यास सांगितले होते. मिणा यांनी स्वत: दोन तास कसून चौकशी केली. त्यानंतर बाजार समितीच्या सर्व संचालकांवर गुन्हे दाखल करून, पुढील कारवाईचे निर्देश ठाणेदारांना देण्यात आले. ठाणेदारांनी संचालकांविरुद्ध भादंविचे कलम ४२० ब, ४६५, ४६८, ३४ व सहकलम ५ अ, ११ ई व ड अन्वये गुन्हे दाखल केले. त्यानंतर दीडच्या सुमारास १७ संचालकांना तातडीने अटक करण्यात आली. चौकशीकरिता बोलावलेल्या इतर संचालकांना अटकेतून सूट देण्यात आली.
जनावरांच्या अवैध वाहतुकीच्या प्रकरणात संचालकांना अटक होण्याची घटना राज्यात एकमेव चांदूर बाजार येथील बाजार समितीत घडली आहे. बुधवारी अटक करण्यात आलेल्या संचालकांमध्ये बबलू देशमुख गटाचे सभापती प्रवीण वाघमारे, उपसभापती कांतीलाल सावरकर, अरविंद लंगोटे, मनोज नांगलिया, अमोल लंगोटे, प्रमोद घुलक्षे, नंदकिशोर वासनकर, हरिभाऊ बोंडे, विलास शेकार, सतीश धोंडे तसेच प्रहारचे मंगेश देशमुख, विनोद जवंजाळ, सुभाष मेश्राम, सत्तारखाँसह तज्ज्ञ संचालक विलास तायवाडे, सतीश मोहड, पणन महासंघाने नियुक्त केलेले संचालक सुरेश विधाते यांचा समावेश आहे.
पोलीस ठाण्यापुढे गर्दी
संचालक मंडळाला अटक झाल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने शहरात पसरली. त्यामुळे बघ्यांची एकच गर्दी पोलीस ठाण्यापुढे झाली होती. अटक करूनही त्यांना कार्यालयीन वेळेपर्यंत न्यायालयात हजर न केल्याने या कारवाईबाबत नागरिकांमध्ये निरनिराळ्या चर्चा, तर्क-वितर्कांना उधाण आले होते.
प्रकरणात केवळ चौकीदार दोषी नसून, संचालक मंडळही दोषी असल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले आहे. पुढील चौकशी सुरू आहे.
- अजय आकरे, ठाणेदार