पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा
By Admin | Published: January 3, 2016 12:38 AM2016-01-03T00:38:17+5:302016-01-03T00:38:17+5:30
प्रत्येक काम पोलिसांचेच आहे, अशी भावना जनतेत निर्माण झाली आहे. प्रत्येक घटनेच्यावेळी पोलीस उपस्थित असायलाच हवा, असे सर्वसामान्यांना वाटते.
पालकमंत्र्यांचे प्रतिपादन : पोलीस स्थापना दिवस साजरा
अमरावती : प्रत्येक काम पोलिसांचेच आहे, अशी भावना जनतेत निर्माण झाली आहे. प्रत्येक घटनेच्यावेळी पोलीस उपस्थित असायलाच हवा, असे सर्वसामान्यांना वाटते. परंतु अनेक घटनांच्या ठिकाणी पोलिसांना लगेच पोहोचणे कठीण होते, अशा घटनांमधून पोलिसांबाबत सर्वसामान्यामध्ये नकारात्मक भूमिका निर्माण झाली आहे. पोलीसही आपल्यातील एक घटक आहे आणि त्यांना मदत करण्याची जबाबदारी आपलीही असावी. नागरिकांनी पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त आयोजित पोलीस प्रदर्शनीच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर, उद्घाटक म्हणून पालकमंत्री प्रवीण पोटे, प्रमुख पाहुणे न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उपसंचालक विजय ठाकरे, पोलीस उपायुक्त सोमनाथ व मोरेश्वर आत्राम उपस्थित होते. पोटे म्हणाले, नागरिकांनी पोलिसांविषयी नकारात्मक भावना सोडायला पाहिजे, पोलीस जसे वागतील तशी प्रतिमा शासनाची नागरिकांमध्ये निर्माण होते. त्यामुळे पोलिसांनीही जबाबदारी ओळखून कर्तव्य बजावावे, असा सल्ला पोटे यांनी दिला. वसंत हॉल येथे पोलीस प्रदर्शनी लावण्यात आली होती.
त्यामध्ये शस्त्र प्रदर्शनी, श्वान पथकाची कामगिरी, बॉम्बशोधक व नाशक पथकाची कामगिरी, आर्थिक घोटाळ्यांची माहितीचे स्टॉल, सायबर गुन्हे, वाहतूक व्यवस्थापन व नियमन आदी कामाकाजाच्या माहितीसंदर्भात स्टॉलची प्रदर्शनी लावण्यात आली होती. मान्यवरांनी प्रदर्शनीला भेट देऊन पोलिसांचे मनोबल वाढविले. संचालन पोलीस उपनिरीक्षक नितीन थोरात, प्रास्तविक सोमनाथ घार्गे तर आभार मोरेश्वर आत्राम यांनी केले. (प्रतिनिधी)