हवामानानुसार पीक पद्धती बदला

By admin | Published: June 28, 2017 12:29 AM2017-06-28T00:29:30+5:302017-06-28T00:29:30+5:30

जून ते आॅक्टोबर या कालावधीत पडणाऱ्या पावसाच्या पाण्यावर जिल्ह्यातील कोरडवाहू शेतीतील खरीप हंगाम निर्भर असतो.

Change the crop pattern according to weather | हवामानानुसार पीक पद्धती बदला

हवामानानुसार पीक पद्धती बदला

Next

खरिपाला सुरूवात : कोरडवाहू शेतीत आंतरपीक महत्त्वाचे
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : जून ते आॅक्टोबर या कालावधीत पडणाऱ्या पावसाच्या पाण्यावर जिल्ह्यातील कोरडवाहू शेतीतील खरीप हंगाम निर्भर असतो. मात्र मागील पाच वर्षांचा आढावा घेता पावसाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हवामान बदलत असताना पीक पद्धतीही बदलणे गरजेचे आहे. पिकांच्या उत्पादकतेत स्थिरता आणण्यासाठी आंतरपीक घेणे महत्त्वाचे आहे.
दरवर्षी पावसाची अनिश्चितता कायम आहे. कधी अधिक पाऊस, तर कधी पावसात खंड यामुळे शेतकरी अडचणीत येत आहेत. कमी पावसाच्या भागात प्रामुख्याने हलक्या व मध्यम स्वरूपाच्या जमिनीत कमी कालावधीची पिके घेणे व वाणांची निवड करणे आवश्यक आहे. मूग, उडीद व जमिनीवर पसरून कमी उंचीची पिके व जमिनीची धूप थांबविण्यासाठी मूग, उडीद व सोयाबीन या पिकांचा आंतरपीक म्हणून अवलंब करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढून सूक्ष्म जिवांच्या संख्येत वाढ होते. मुख्य पीक व आंतरपीक यांची मुळे जमिनीच्या वेगवेगळ्या स्तरात वाढणारी असावीत. कपाशीची मुळे जमिनीच्या खालच्या स्तरातून अन्नद्रव्य शोषून घेतात.
आंतरपीक म्हणून मूग व उडीद पिकांची मुळे जमिनीच्या वरच्या स्तरातून पाणी व अन्नद्रव्ये शोषून घेतात. मुख्य पीक व आंतरपिके एकमेकांना पूरक अशी अधिक उत्पादन देणारी निवडावी. अधिक अन्नद्रव्यांची गरज असणाऱ्या पिकांचा आंतरपीकातील समावेश टाळावा.
हवामानात होणारा बदल शेती पिकावर विपरीत परिणाम करतो. पावसाचा खंड व दररोज वाढणारे तापमान बिजांकुरावर व रोपांवर परिणाम करतात. यासाठी पावसाचे व्यवस्थापन व आंतरपीक पद्धतीच्या पिकांसाठी नत्राचा योग्य वापर करणे शेतकऱ्यांसाठी काळाची गरज ठरत आहे.

सोयाबीनमध्ये हवे
तुरीचे आंतरपीक
जिल्ह्यात सर्वाधिक पेरणीक्षेत्र सोयाबीनचे आहे. कोरडवाहू क्षेत्रात जिथे कमी अधिक पाऊस पडतो, अशा क्षेत्रात सोयाबीनसोबत तुरीचे आंतरपीक घेणे महत्त्वाचे आहे. सोयाबीनच्या दोन, चार ओळीनंतर तुरीची ओळ पेरावी. यामुळे तुरीची वाढ झाल्यानंतर शेंगा भरण्याच्या अवस्थेत कीटकनाशकांची फवारणी करणे सोईचे होते. ही पेरणी जुलैच्या १५ तारखेपर्यंत करता येईल.

आंतरपीक पद्धतीचे
व्यवस्थापन महत्त्वाचे
मध्यम किंवा भारी जमिनीत कपाशी, तूर, ज्वारी, सोयाबीन आदी पिके घ्यावीत. तसेच लवकरच पसरणाऱ्या नत्राची निवड करावी. दोन ओळीमध्ये योग्य अंतर ठेवून हेक्टरी रोपांची व झाडांची संख्या योग्य ठेवावी. पेरणीमध्ये रूंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केल्यास पावसाच्या पाण्याचे संवर्धन योग्यरितीने करता येते.

आंतरपीक पद्धतीचे फायदे
सरासरीपेक्षा कमी अधिक पाऊस झाला तरीही आंतरपीक पद्धतीमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी राहते.
पट्टापेर पद्धतीत एक पीक तृणधान्य व एक पीक कडधान्य घेतल्यास जमिनीची धूप कमी होण्यास मदत होते.
कडधान्य वर्गातील मूग, उडीद, तूर किंवा सोयाबीन पीक आंतरपीक म्हणून घेतल्यास त्या पिकांच्या मुळावरील गाठीमध्ये असणारे जिवाणू वातावरणातील नत्र शोषून जमिनीतून पिकांसाठी उपलब्ध करून देतात. या पिकांची पानगळ व अवशेष यामुळे जमिनीची सुपिकता व सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढते.

कपाशी अधिक मूग आंतरपीक हवे
कापूस अधिक मूग व उडीद यासारखी आंतरपिके घेता येतात.कपाशीच्या बीटी वाणासाठी ९० बाय ६० सेमी. आणि ९० बाय ९० अंतरावर शिफारस करण्यात आली आहे. कापसाच्या दोन ओळीमध्ये टोकन करून उडीद किंवा मुगाचे आंतरपीक घेता येते.

कपाशीत तुरीचे आंतरपीक नको
कापसाच्या ६ ते ८ ओळीनंतर तुरीच्या दोन ओळी पेराव्यात. वास्तविकत: कपाशी व तूर दोन्ही ऊंच वाढणारी, विस्तारणारी आणि दीर्घ (१६० ते १८० दिवस) अवधीची पिके असल्याने तसेच सूर्यप्रकाश, ओलावा व अन्नद्रव्यांच्या गरजा समान असल्याने ही पिके एकमेकास स्पर्धक ठरतात.

Web Title: Change the crop pattern according to weather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.