आदिवासी आरक्षणासाठी बाराशे विद्यार्थ्यांच्या जातीच्या नोंदीत बदल? मूळ 'जात' उल्लेख ब्लेडने खोडून करुन केला असा बदल
By गणेश वासनिक | Published: November 5, 2023 03:58 PM2023-11-05T15:58:45+5:302023-11-05T15:59:20+5:30
नायकडा' ही जात नोंद करताना वेगळी शाई, वेगळ्या अक्षरात 'कडा', 'यकडा', 'नायकडा' असे शब्द जातीच्या रकान्यात नोंदवून नियमबाह्य फेरबदल करण्यात आले आहे.
अमरावती : राज्यात अनुसूचित जमातीच्या यादीत क्रमांक ३५ वर 'नायकडा' ही जमात आहे. या जमातीच्या नामसदृष्याचा गैरफायदा घेऊन आदिवासी समाजाचे आरक्षण लाटण्यासाठी बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यामधील तरोडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत चक्क १२०० विद्यार्थ्यांची मूळ 'जात' ब्लेडने खोडून 'नायकडा' अशी करण्यात आली आहे. 'नायकडा' ही जात नोंद करताना वेगळी शाई, वेगळ्या अक्षरात 'कडा', 'यकडा', 'नायकडा' असे शब्द जातीच्या रकान्यात नोंदवून नियमबाह्य फेरबदल करण्यात आले आहे.
जातीच्या रकान्यात नियमबाह्यरित्या फेरबदल करण्यात आल्याची बाब अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, औरंगाबाद यांनी अजय ईश्वरसिंग भोकन, आदित्य किशोरसिंग भोकन, पवन भागचंद भोकन यांच्याबाबत दिलेल्या निर्णयात उघड झाली आहे. या तिघांनी उपविभागीय अधिकारी सिल्लोड जि. औरंगाबाद यांचे कार्यालयातून 'नायकडा' जमातीचे जातप्रमाणपत्र १५ जून २०१८ रोजी मिळविले होते. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने या तिघांचेही जातप्रमाणपत्र रद्द आणि जप्त केले आहे.
तरोडा गावात एकही ‘नायकडा’ जातीचा विद्यार्थी शाळेत प्रवेशित नाही. सदर घटनेच्या अनुषंगाने गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मोताळा जि. बुलढाणा आणि इतर सदस्य यांच्या समितीने सादर केलेल्या अहवालाची प्रत जातपडताळणी समितीसमोर सादर करण्यात आली आहे. नमूद अहवालामध्ये शाळेतील अभिलेख्यातील सुमारे १२०० विद्यार्थ्यांच्या मूळ जातीच्या नोंदी ब्लेडने नष्ट करुन 'नायकडा'असा फेरबदल केल्याची वस्तुस्थिती नमूद केली आहे. तसेच नमूद शाळेतील सन १९६८ आणि १९५२-५३ या वर्षातील हजेरी बुकाचे अभिलेख समितीला प्राप्त झाले असून तरोडा या गावात एकही 'नायकडा' जातीचा विद्यार्थी शाळेत दाखल झाला नसल्याचे हजेरीपटातील नोंदीआधारे दिसून आले आहे.