सेमिस्टर पॅटर्न परीक्षेत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 10:43 PM2018-04-08T22:43:05+5:302018-04-08T22:43:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सत्र (सेमिस्टर) पॅटर्न परीक्षेत आमुलाग्र बदल केले आहेत. त्यामुळे महाविद्यालयांना मोठा दिलासा मिळणार आहे. २८ मार्च रोजी त्याअनुषंगाने अध्यादेश जारी करण्यात आले आहे.
महाराष्ट्र सार्वत्रिक विद्यापीठ कायद्यान्वये गतवर्षीपासून सेमिस्टर पॅटर्न परीक्षा लागू केली. यानिर्णयाची अंमलबजावणी पाचही जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये सुरू झाली. मात्र, सेमिस्टर पॅटर्नमुळे महाविद्यालयांचे वेळापत्रक कोलमडले .सेमिस्टर पॅटर्न परीक्षा नको, असा सूर नुकत्याच पार पडलेल्या सिनेट सभेत उमटला. परंतु, सिनेट सभेपूर्वी विद्यापीठ प्रशासनाने २८ मार्च रोजी सेमिस्टर पॅटर्न परीक्षेत आमुलाग्र बदल करण्यासाठीचा अध्यादेश जारी केला. सिनेट सभेत हा विषय येताच सदस्यांनी सेमिस्टर पॅटर्न परीक्षेबाबतच्या धोरणावर अक्षरश: हल्ला चढविला होता. सेमिस्टर पॅटर्न परीक्षेत दोन वर्षीय अभ्यासक्रम (४ सत्रीय) पहिले व दुसरे सत्र अभ्यासक्रमाची परीक्षा, तीन वर्षीय अभ्यासक्रम (६ सत्रीय) पहिले व दुसरे सत्र अभ्यासक्रमाची परीक्षा, चार वर्षीय अभ्यासक्रम (८ सत्रीय) पहिले व दुसरे सत्र अभ्यासक्रमाची परीक्षा, पाच वर्षीय अभ्यासक्रम (१० सत्रीय) पहिले, तिसरे, पाचवे व सातवे सत्र अभ्यासक्रमाची परीक्षा महाविद्यालय स्तरावर घेण्याचा निर्णय झाला आहे. विद्यापीठस्तरावर एक वर्षीय अभ्यासक्रमाचे पहिले व दुसरे सत्र अभ्यासक्रमाची परीक्षा, दोन वर्षीय अभ्यासक्रम (४ सत्रीय) तिसरे व चौथे सत्र अभ्यासक्रम परीक्षा, तीन वर्षीय अभ्यासक्रम (६ सत्रीय) तिसरे, चौथे, पाचवे व सहावे सत्र अभ्यासक्रमाची परीक्षा, चार वर्षीय अभ्यासक्रम (८ सत्रीय) दुसरे चौथे, सहावे, सातवे व आठवे सत्र अभ्यासक्रमाची परीक्षा, अभियांत्रिकी व तांत्रिकी अभ्यासक्रम तिसरे, चौथे, पाचवे, सहावे, सातवे व आठवे सत्र अभ्यासक्रमाची परीक्षा, पाच वर्षीय अभ्यासक्रम (१० सत्रीय) अभ्यासक्रमाची परीक्षा दुसरे, चौथे, सहावे, आठवे, नववे व दहावे सत्र अभ्यासक्रमाचा परीक्षा घेतल्या जातील.
नव्या अध्यादेशानुसार परीक्षा संचालन विद्यापीठाकडे आले आहे. महाविद्यालयांना केवळ परीक्षा घेणे, गुणपत्रिकांची तपासणी करणे आणि विद्यार्थ्यांचे गुण हे एका सीटमध्ये पाठविणे एवढीच कामे करावी लागणार आहे.
- जयंत वडते, संचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग