4 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमात बदल, आयोगाचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 06:20 PM2018-02-10T18:20:27+5:302018-02-10T18:20:37+5:30
राज्यात सध्या सुरू असलेल्या ३१२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ४,१०१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूक कार्यक्रमात राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी अंशत: बदल केला.
अमरावती : राज्यात सध्या सुरू असलेल्या ३१२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ४,१०१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूक कार्यक्रमात राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी अंशत: बदल केला. यामध्ये दोन्ही टप्प्यांतील निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज सादरीकरणाला दोन दिवसांची मुदतवाढ दिली. आता पहिल्या टप्प्यात २५ फेब्रुवारीला, तर दुस-या टप्प्यात २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. राज्यात १ ते ६ मार्च या कालावधीत मुदत संपणा-या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ५ ते १० फेबु्रवारी दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. मात्र, यामध्ये संगणकीकृत पद्धतीने अर्ज व शपथपत्रे दाखल करण्यास उमेदवारांना अडचणी येत असल्याच्या तक्रारी अनेक जिल्ह्यांतून आयोगाला प्राप्त झाल्याने आता आयोगाने उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास १२ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे.
या सर्व ग्रामपंचायतींमध्ये मतदान २५ फेब्रुवारी व मतमोजणी २६ फेब्रुवारीला होणार आहे. राज्यात मार्च ते मे २०१८ या कालावधीत मुदत संपणा-या ३१२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ४,१०१ ग्रामपंचायतींच्या ६,८७१ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील अंशत: बदल करण्यात आला. यामध्ये १२ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे, १४ ला छाननी, १६ ला उमेदवारी अर्जाची माघार व चिन्हवाटप, २७ फेब्रुवारीला मतदान व २८ ला मतमोजणी होणार आहे. कोकण विभागात ३९, नाशिक ७५, पुणे १३१, औरंगाबाद ३५, अमरावती १० व नागपूर विभागात २२ ग्रामपंचायतींमध्ये सध्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहेत.
४ हजार १०१ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक
सध्या राज्यात ४,१०१ ग्रामपंचायतींच्या ६,८७१ रिक्त सदस्यपदांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये कोकण विभागात ६४६ ग्रामपंचायतींमध्ये १०८२, नाशिक विभागात ६६३ ग्रामपंचायतींमध्ये १०७२, पुणे विभागात ९६९ ग्रामपंचायतींमध्ये १८३४, औरंगाबाद विभागात ६९३ ग्रामपंचायतींमध्ये ९५९, अमरावती विभागात ५९२ ग्रामपंचायतींमध्ये ९०७, तर नागपूर विभागात ५३८ ग्रामपंचायतींमध्ये १०१७ सदस्यपदे रिक्त असल्याने निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे.