बदल्यांचे आदेश धडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 11:53 PM2018-05-28T23:53:55+5:302018-05-28T23:54:37+5:30
वर्षभरापासून प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील २ हजार ७९८ शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेश अखेर सोमवारी धडकले. यामध्ये मराठी माध्यमाच्या २ हजार ६०३, तर उर्दूच्या १९५ शिक्षकांच्या बदल्या आहेत. ३१४ शिक्षकांना खो (विस्थापित) झाले आहेत. बदली प्रक्रिया प्रथमच आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात आल्याने शिक्षकांमध्ये 'कही खुशी कही गम' असे वातावरण दिसून आले. बदलीपात्र शिक्षकांना तत्काळ पदभार देण्याचे आदेशात नमूद आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वर्षभरापासून प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील २ हजार ७९८ शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेश अखेर सोमवारी धडकले. यामध्ये मराठी माध्यमाच्या २ हजार ६०३, तर उर्दूच्या १९५ शिक्षकांच्या बदल्या आहेत. ३१४ शिक्षकांना खो (विस्थापित) झाले आहेत. बदली प्रक्रिया प्रथमच आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात आल्याने शिक्षकांमध्ये 'कही खुशी कही गम' असे वातावरण दिसून आले. बदलीपात्र शिक्षकांना तत्काळ पदभार देण्याचे आदेशात नमूद आहे.
शिक्षकांच्या बदल्या दरवर्षी चर्चेचा विषय ठरतो. जिल्ह्यात मागील वर्षी शिक्षकांच्या बदल्या झाल्या नव्हत्या. यावर्षी शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने राबविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. त्यासाठी शिक्षकांना आॅनलाईन अर्जात पसंतीचे २० गावे निवडण्याचे पर्याय देण्यात आले होते. आॅनलाइन अर्ज करून सहा महिने उलटले तरी बदल्यांचे आदेश निघाले नव्हते. त्यामुळे शिक्षकांमध्ये बदली प्रक्रियाविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते.
या महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यातील ९३ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचे आदेश निघाले. त्यानंतर शिक्षकांना जिल्हा अंतर्गत बदल्या यांचे आदेशाची प्रतीक्षा होती. सोमवार २८ मे रोजी जिल्ह्यातील २ हजार ७९८ हजारावर शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश निघाल्याची माहिती मिळतात काही शिक्षकांनी सर्वशिक्षा अभियानच्या कार्यालयात गर्दी केल्याचे दिसून आले. एका शाळेवर कार्यरत असलेल्या शिक्षकांनी एकमेकांना संपर्क करून कुठे बदली झाली याबाबत विचारपूस करीत होते.
जिल्ह्यातील ३१४ शिक्षक विस्तापित झालेले आहेत. यावर्षी बदली प्रक्रिया प्रथमच आॅनलाइन पद्धतीने करण्यात आल्यामुळे यात कुणालाही हस्तक्षेप करता आला नाही. त्यामुळे शिक्षक बदल्यांसाठी केल्या जाणाऱ्या हस्तक्षेपाला आळा बसला. याबाबत शिक्षकांमधून समाधान व्यक्त होत आहे. बदलीपात्र शिक्षकांना तत्काळ बदली झालेल्या शाळेवर जाऊन कार्यभार स्वीकारण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी आर.डी. तुरणकर यांनी 'लोकमत'शी सांगितले.
आॅनलाईन बदल्या हस्तक्षेपाला ब्रेक
शिक्षक संघटनांमध्ये काम करणाऱ्यां पदाधिकारी व शिक्षक नेत्यांसाठी बदल्यांचा मुद्दा नेहमीच प्रतिष्ठेचा राहिला आहे. यंदा मात्र आॅनलाईन प्रक्रियेमुळे कोणालाच बदली प्रक्रियेत हस्तक्षेप करता आलेला नाही. वर्षानुवर्षे पसंतीच्या ठिकाणी बदली मिळविणाºया तसेच एकाच ठिकाणी काम करणारे शिक्षक आॅनलाईन प्रक्रियेमुळे अस्वस्थ झाल्याच्या प्रतिक्रिया काहींनी 'लोकमत'कडे व्यक्त केल्या.
प्रशासकीय विनंती, आपसी बदल्या
शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या प्रशासकीय, विनंती, आपसी बदल्यांसोबतच सन २०१७-१८ मधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे या बदल्यांमध्ये समायोजन करण्यात आले आहे. विस्थापित ३१४ शिक्षकांना पुन्हा २० गावांचे आॅप्शन (सवलत) त्यांच्या आॅनलाइन लॉगीनवर नोंदवावे लागणार आहे.
खो बसलेल्या शिक्षकांनी त्यांच्या लॉगीनवर २० गावांची नोंदणी त्वरित करावी. बदली झालेल्या सर्व शिक्षकांच्या कार्यमुक्तीचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. त्यांनी संबंधित ठिकाणी तातडीने रूजू व्हावे.
- जयश्री राऊत,
उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक)