दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात अनागोंदी; ‘जनारोग्य’ धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 09:57 PM2018-11-16T21:57:17+5:302018-11-16T21:57:35+5:30
शहरासह तालुक्यातील १३३ गावांना रुग्णसेवा पुरविणारे येथील उपजिल्हा रुग्णालय समस्यांच्या विळख्यात अडकले आहे. ना पुरेसे मनुष्यबळ, ना साधनसामग्री; अशा अडचणीमुळे रुग्णसेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. या रुग्णालयालाच उत्तम आरोग्यसेवेचा बूस्टर डोस देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. नानाविध यंत्रसामग्री बंद अवस्थेत असताना रुग्णांना आवश्यक रक्तसाठाच उपलब्ध नसल्याचे वास्तव उघड झाले आहे.
किरण होले।
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : शहरासह तालुक्यातील १३३ गावांना रुग्णसेवा पुरविणारे येथील उपजिल्हा रुग्णालय समस्यांच्या विळख्यात अडकले आहे. ना पुरेसे मनुष्यबळ, ना साधनसामग्री; अशा अडचणीमुळे रुग्णसेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. या रुग्णालयालाच उत्तम आरोग्यसेवेचा बूस्टर डोस देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. नानाविध यंत्रसामग्री बंद अवस्थेत असताना रुग्णांना आवश्यक रक्तसाठाच उपलब्ध नसल्याचे वास्तव उघड झाले आहे.
तालुक्याचा भार सोसणाºया उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार ढेपाळल्याने ‘जनारोग्य’ धोक्यात आले आहे. सुविधांची वानवा असल्याने नागरिकांना नाइलाजास्तव खासगी दवाखान्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
हृदयरुग्णांकरिता आवश्यक ईसीजी यंत्रणा सहा महिन्यांपासून नादुरुस्त आहे. यामुळे रुग्णांना खासगी सेवा घ्यावा लागतात. बाळंतपणासाठी आवश्यक असलेल्या सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी स्त्रीरोग (गायनिक) तज्ज्ञ उपलब्ध नाही. याशिवाय उपलब्ध तज्ज्ञ आठवड्यातून दोन दिवस सेवा देत असल्याने अन्य दिवशी दाखल होणाºया प्रसूतांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक स्त्री रुग्णांना खासगी रुग्णालयांत जाण्याशिवाय पर्याय नाही.
सहा महिन्यांत अनेक महिलांना अन्य दवाखान्यात सिझेरियन करावे लागल्याची वस्तुस्थिती आहे. रुग्णांना लागणारी औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने बाहेरून औषधी आणण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, महिलांची सिझर पद्धतीने प्रसूती झाल्यानंतर रक्ताची अत्यंत निकड असते. तथापि, उपजिल्हा रुग्णालयात दोन महिन्यांपासून कोणत्याही गटाचे रक्त उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे.
वर्षा लोधी (रा. आराळा ) यांची १३ नोव्हेंबर रोजी रात्री ११ च्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती झाली. तिने गोंडस बाळाला जन्म दिला. तो आनंद साजरा होत असताना त्या प्रसूतेच्या अंगात रक्त कमी असल्याने तिला रक्ताची तातडीने आवश्यकता होती. मात्र, तिला जुळणारा रक्तगट उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसल्याने त्यांना अमरावतीत हलविण्यात आले. विशेष म्हणजे, बहुतांश साधारण आर्थिक स्थितीतील प्रसूता येथे दाखल होत असतात. या प्रकरणातदेखील परिस्थितीमुळे वर्षा ही अमरावतीला जाऊ इच्छित नव्हत्या. अशा घटनांमध्ये रक्तसाठा उपलब्ध नसल्याने भविष्यात प्राणहानी झाल्यास त्यास जबाबदार कोण राहणार, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
दिवाळीच्या सुट्यांमुळे जिल्ह्यात कुठेही रक्तदान शिबिर घेण्यात आले नाही. त्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवला. रुग्णालयातील कॅबिनेट मशीन बंद पडल्यामुळे येथे रक्त उपलब्ध झाले नाही. दोन दिवसांत मशीन दुरूस्त करून रक्ताची व्यवस्था करण्यात येईल.
- सुनील राठोड
वैद्यकीय अधिकारी
उपजिल्हा रुग्णालय, दर्यापूर