आरोग्य केंद्रातील अनागोंदी चव्हाट्यावर
By admin | Published: July 10, 2017 12:09 AM2017-07-10T00:09:24+5:302017-07-10T00:09:24+5:30
जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी मेळघाटासह अचलपूर तालुक्यात मागील दोन दिवसांत केलेल्या ...
झेडपी अध्यक्षांचा दौरा : आकस्मिक भेटीत प्रशासनाची पोलखोल
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी मेळघाटासह अचलपूर तालुक्यात मागील दोन दिवसांत केलेल्या आकस्मिक दौऱ्यात जि.प.आरोग्य केंद्र व शाळांमधील अनागोेंदी चव्हाट्यावर आली. यागैरकारभारासाठी जबाबदार कर्मचारी, अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश झेडपी अध्यक्षांनी दिले आहेत. या दौऱ्याच्यावेळी डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे हे देखील उपस्थित होते.
अध्यक्षांच्या दौऱ्याचा पहिला टप्पा अचलपूर पंचायत समितीमधून सुरू झाला. त्यांनी बांधकाम उपविभागाला भेट देऊन येथील दस्तऐवजांची तपासणी केली. यावेळी कनिष्ठ अभियंता दौऱ्यावर असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यांच्या दौऱ्यांची रजिस्टरमध्ये कुठलीही नोंद नव्हती.
पंस.मधील विस्तार अधिकारी सुद्धा चमक येथे दौऱ्यावर गेल्याचे अध्यक्षांना सांगण्यात आले. मात्र, शहानिशा केली असता ते कर्तव्यावरच नसल्याचे उघड झाले. यानंतर अध्यक्षांनी चिखलदरा पंचायत समिती कार्यक्षेत्रातील बिहाली आणि धारणी तालुक्यातील टिंटबा, मोगर्दा येथील जि.प.शाळांना भेटी देऊन पोषण आहाराची तपासणी केली. त्यांनी मोगर्दा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला भेट दिली असता याठिकाणी प्रशासकीय कामकाजात बऱ्याच उणिवा दिसून आल्यात. पंचायत समितीच्या प्रशासकीय कामकाजाची माहिती घेऊन त्यांनी जिल्हा परिषद हायस्कूल तसेच मेळघाटातील पुलांच्या कामाची पाहणी सुद्धा केली.
आरोग्य यंत्रणेचा बोजवारा
जिल्हा परिषद अध्यक्षांनी मोगर्दा येथील आरोग्य उपकेंद्र तसेच आयुर्वेदिक दवाखान्याला दिलेल्या भेटीत वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याचे दिसून आले. इतकेच नव्हे तर दवाखान्याला कुलूप होते. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचा खरा चेहरा समोर आला आहे.