शिक्षक बँक आमसभेत बांधकाम लाभांशच्या मुद्द्यावरून घमासान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 12:45 PM2023-08-07T12:45:10+5:302023-08-07T12:46:13+5:30
सभेत मुद्दे मांडण्याच्या मुद्द्यांवरून आमसभा गाजली
अमरावती : जिल्हा परिषदशिक्षक सहकारी बँकेच्या नवीन इमारत बांधकाम व लाभांश तसेच अन्य जिल्ह्यांतून प्रतिनिधित्व मिळावे, आदी विषयांवर रविवारी जिल्हा परिषदशिक्षक बँकेच्या आमसभेत चांगलेच घमासान झाले. काही वेळा तर सदस्यांनी एकमेकांकडे माईकसुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न केल्याने काही वेळ वातावरण चांगलेच तापले होते. असे असले तरी अनेक नवीन प्रस्ताव आमसभेत पारित करण्यात आले.
जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष गोकुळदास राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात होताच वार्षिक ताळेबंद, लेखापरीक्षण आधी विषय घेण्यात आले. शिक्षक बँकेच्या जुन्या इमारतीच्या ठिकाणी नवीन प्रशासकीय इमारत बांधकामास परवानगी देण्याचा विषय सभागृहात मांडण्यात आला. जवळपास साडेचार कोटी रुपये त्यासाठी निधी मंजूर करण्यात आल्याचे अध्यक्षांनी सांगितले. या विषयावर मते मांडू द्यावीत, अशी आग्रही मागणी काही सभासदांनी केली. त्यानंतर सभासदांनी लाभांच्या मुद्द्यावर आग्रही भूमिका घेतली. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार लाभांशाचे वाटप होईल, असे अध्यक्षांनी सांगितले. बँकेचा न्यायालयीन खर्च कमी करण्याच्या अनुषंगाने बँकेच्या उपविधी क्रमांक ३८, ४९, ३, १०च्या दुरुस्तीला मान्यता देण्यात आली.
याशिवाय वाशिम व अकोला येथे नवीन शाखा उघडण्यासाठी आरबीआयकडे प्रस्ताव पाठविण्यालाही मंजुरी देण्यात आली. सभेमध्ये जि. प. कर्मचारी युनियनचे अध्यक्ष पंकज गुल्हाने, नयन काळबांडे, सुनील कुकडे, मदन उमप यांनीसुद्धा प्रश्न उपस्थित केले. सभेला उपाध्यक्ष राजेश गाडे, संचालक तुळशीदास धांडे, प्रफुल्ल शेंडे, सुरेंद्र मेटे, गौरव काळे, रामदास कडू, मंगेश खेरडे, उमेश चुनकीकर, मनोज चोरपगार, अजय आनंद पवार, कैलास कडू, राणा गावंडे, मनीष काळे, मोनाजीम गफार, संभाजी रेवाळे, विजय कोठाळे, संजय नागे, प्रभाकर जोड, सरिता काटोळे, संगीता तडस, तज्ज्ञ संचालक राज्यपाल वानखडे, ॲड. शकील अहमद आदी उपस्थित होते.