महापालिकेतील डझनावर ‘प्रभारी’ झालेत साहेब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 10:53 PM2018-08-12T22:53:05+5:302018-08-12T22:53:23+5:30
प्रदीप भाकरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नोकरभरतीवर आलेली बंदी व अलिकडे निवृत्त होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यात झालेली वाढ पाहता महापालिकेत प्रभारी राज निर्माण झाले आहे. अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे अन्य पदांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. मात्र ते अधिकारी-कर्मचारी पदनामापुढे प्रभारी लिहिण्यास नकार देत असल्याची वस्तुस्थिती उघड झाली आहे. अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे अधिकारी-कर्मचारी नावापुढे प्रभारी लिहित नसल्याने सर्वसामान्य संभ्रमित झाले आहेत. शासननिर्देशानुसार अधिकारी कर्मचाºयाकडे अतिरिक्त कार्यभार दिल्यास ‘प्रभारी’ लिहिणे बंधनकारक आहे. तथापि या नियमाला महापालिकेतील प्रभारींकडून हरताळ फासला जात आहे.
आयुक्त संजय निपाणे यांनी याबाबत संबंधितांची कानटोचणी करावी व प्रशासकीय तऱ्हा पाळण्याचे आदेश द्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. उपायुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्यांनी नामफलकावर ‘प्रभारी’ लिहून नियमांचा आदर्श वस्तुपाठ घालून घालून दिल्यास अन्य प्रभारी अधिकारी कर्मचाºयांमध्ये सुसंदेश जाईल.
निपाणेंच्या कार्यकाळात फाटा
सहायक आयुक्त, भांडार अधीक्षक, अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख, कार्यकारी अभियंता, शहर अभियंता, पशूशल्य चिकित्सक, अभिलेखागार ही पदे रिक्त आहेत. प्रशासकीय कामकाज सुलभ व्हावे यासाठी या पदांचा अतिरिक्त आणि तात्पुरता कार्यभार अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. असे असताना हे प्रभारी साहेब कुठल्याही प्रशासकीय दस्ताऐवजावर किंवा नामफलकावर प्रभारी लिहिणे जाणूनबुजून पळत आहे. उदाहरणादाखल महापालिकेतील उपायुक्त प्रशासन हे पद प्रतिनियुक्ती वा शासनाकडून भरले जाणारे पद आहे. या पदाचा कार्यभार दीड वर्षापासून पर्यावरण संवर्धन अधिकाºयाकडे आहे. मात्र तेही नावापुढे प्रभारी लिहित नाही. त्यामुळे खुर्चीवर बसलेला अधिकारी प्रभारी की नियुक्ती, असा संभ्रम होवू शकतो. त्यांच्यासह कुणीही नावापुढे प्रभारी लिहिण्याची तसदी घेत नाहीत. पवार यांनी प्रभारी लिहिणे बंधनकारक केले होते. किंवा ते पत्रव्यवहार करताना आपल्या अधिकाºयाच्या पदनामापुढे कंसात का होईना प्रभारी लिहायचे, निपाणेंच्या कार्यकाळात त्यास फाटा देण्यात आला आहे.
हे आहेत प्रभारी
दोन्ही उपायुक्त, भांडार अधीक्षक, सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक, तीनही झोनचे सहायक आयुक्त, अतिक्रमण निर्मुलन विभाग प्रमुख, नगरसचिव, समुदाय विकास अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी, अग्निशमन अधीक्षक, एलबीटी अधीक्षक, बाजार परवाना अधीक्षक , अभिलेखागार.
नियम लागू नाहीत का?
महापालिकेव्यतिरिक्त सर्व शासकीय कार्यालयातील प्रभारी अधिकाऱ्यांच्या नावांपुढे प्रभारी लिहिले जाते. शिक्षणाधिकारी असोत की शिक्षण उपसंचालक, महापालिका आयुक्त असोत की विभागीय आयुक्त, त्यांच्याकडे ज्या पदाचा अतिरिक्त कार्यभार असेल त्या पदनामापुढे प्रभारी लिहिले जाते. मात्र महापालिकेतील अधिकारी, कर्मचाºयांना प्रभारी लिहिण्यात कमीपणा वाटतो.