करजगावात विजयी मिरवणुकीवर दगडफेक
By admin | Published: April 25, 2015 12:15 AM2015-04-25T00:15:14+5:302015-04-25T00:15:14+5:30
तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर काढण्यात आलेल्या भाजप व युवा क्रांती दलाच्या विजयी मिरवणुकीदरम्यान
सात जखमी : आठ अटकेत, चौकाचौकांत एसआरपीच्या तुकड्या
चांदूरबाजार : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर काढण्यात आलेल्या भाजप व युवा क्रांती दलाच्या विजयी मिरवणुकीदरम्यान विरोधी गटाच्या घरासमोर झालेल्या नारेबाजीने भाजपा व प्रहारच्या कार्यकर्त्यात राडा झाला. दगडफेकीत दोन्ही गटाचे सात जण जखमी झाले असून त्यांना अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती वरिष्ठांना देताच करजगावात एसआरपीच्या तुकड्यासह वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
तालुक्यात कालच ४२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल लागला. त्या दरम्यान सर्वच तालुक्यात विजयी मिरवणुका काढण्यात आल्या. मात्र तालुक्यातील करजगाव येथील भाजप व युवाक्रांती संघटनेच्या विजयी मिरवणुकीदरम्यान करजगाव येथील शिवाजी चौकात प्रहारच्या नेत्यांच्या घरासमोर नारेबाजी करण्यात आल्याने परिस्थिती चिघळली आणि दगडफेक करण्यात आली. परिस्थितीचे गांभिर्य ओळखून पोलिसांनी बाहेरुन पोलीस बंदोबस्त बोलावून परिस्थिती नियंत्रणात आणली. ही घटना काल रात्री ९ वाजता घडली.
तणावपूर्ण शांतता, तगडा बंदोबस्त
घटनेच्या निषेधार्थ व सर्व आरोपीच्या अटकेसाठी आज करजगाव वासीयांनी बंद पाळला असून बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. कोणतीही अप्रिय घटना घडू नये, म्हणून करजगावात अचलपूर, परतवाडा, सरमसपुरा, चांदूरबाजार पोलिसासह पोलीस मुख्यालय व एसआरपीची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. शिरजगाव कसब्याचे ठाणेदार चौगुले, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण पौनीकरसह आसेगाव व चांदूरबाजारचा खुफीया विभाग परिस्थितीवर बारिक लक्ष ठेवून आहे.