आधी १० लाखांनी लुबाडले, मग बळजबरी केली! गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2022 06:02 PM2022-01-25T18:02:32+5:302022-01-25T18:30:20+5:30
आरोपीने ओखळीचा फायदा घेत पीडितेकडून १० लाख लुबाडले इतकेच नव्हे तर तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक बळजबरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
अमरावती : तब्बल १० लाख रुपये लुबाडून एका महिलेचे सर्वस्व लुटल्याची घटना गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी सूरज भजगवरे (२५, माताफैल, बडनेरा), सुनील कैथवास (३५, माताफैल), राज गडलिंग (२५, बडनेरा) व एक महिला अशा चौघांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारीनुसार, आरोपी सूरज भजगवरे याने पीडिताला खरेदीसाठी १० लाख रुपये मागितले. मित्र म्हणून तिने त्याला ती रक्कम दिली. १० जानेवारी रोजी ती रक्कम परत देण्याची बतावणी करून सूरज तिला ९ जानेवारी रोजी रात्री १० च्या सुमारास बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. तेथे तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक शोषण केले. १० रोजी सकाळी ७ च्या सुमारास तिला घरी सोडले. रक्कम खोलीवर आणून देण्याची बतावणी केली.
काही वेळाने पुन्हा रेल्वे स्टेशनवर रक्कम आणून देण्याची बतावणी करून तिला तेथे बोलावण्यात आले. तेथे बॅगमध्ये पैसे टाकल्याचेदेखील सांगितले. मात्र, ते न दाखविता तो तिला बॅगपासून दूर रेल्वे फाटकाजवळ फोटो काढण्यास घेऊन गेला. तेवढ्या वेळात आरोपी सुनील कैथवास याने आपल्या त्या बॅगमधून ती रक्कम काढून घेतल्याचे पीडिताचे म्हणणे आहे. रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्यावर बॅग चेक केली असता, त्यात पैसे नसल्याचे लक्षात आल्याने तिने वारंवार सूरजशी संपर्क साधला.
निव्वळ बनवाबनवी
११ जानेवारी रोजी सूरजने राज गडलिंग याच्यासोबत फोनवर बोलायला लावून पैसे आणून देण्याची बतावणी केली. त्यानंतर सूरजने आपण हिंगणघाटपर्यंत आलो आहे. पैसे सोबतच आहेत, अशी बतावणी केली. १३ जानेवारी रोजी सूरजने पीडिताला त्याच्या आईशी फोनवरून बोलायला लावले. काही वेळानंतर तुझे कशाचे पैसे, म्हणून सूरजने फोन कट केला. तेव्हापासून सूरजने पीडिताचा फोन करणे बंद केला. त्यामुळे पीडिताने संबंधित महिलेशी संपर्क साधला. मात्र, पलीकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. सरतेशेवटी तिने २४ जानेवारी रोजी रात्री गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले. आरोपी सूरजने आपल्यावर शारीरिक बळजबरी केल्याची तक्रार तिने नोंदविली.
सहायक पोलीस आयुक्तांनी जाणले वास्तव
सहायक पोलीस आयुक्त पूनम पाटील यांनीदेखील पोलीस ठाणे गाठून पीडिताची बाजू ऐकून घेतली. ठाणेदार आसाराम चोरमले यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मनीषा सामटकर यांनी तिचे बयाण नोंदविले.