आधी प्रेम मग ब्रेकअप नंतर इन्स्टाग्रामवर बदनामी! तरुणाविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2022 04:33 PM2022-01-30T16:33:20+5:302022-01-30T19:03:57+5:30
आता आपल्यात काहीही राहले नाही. त्यामुळे कॉल किंवा मॅसेज करू नको, असे त्याला बजावले. मात्र, त्यानंतरही तो कॉल व मॅसेज करून तिला त्रास देत राहिला. २३ जानेवारी रोजी तिला संदेश पाठवून त्याने तिचा पाठलागदेखील केला.
अमरावती : प्रेमसंबंध, ब्रेकअप व त्यानंतर सुडापोटी पेटून उठलेल्या प्रियकराकडून पूर्वप्रेयसीची बदनामी, असा काहीसा प्रकार नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाला. हा संपूर्ण घटनाक्रम १५ ऑक्टोबर २०१९ ते २३ जानेवारी २०२२ या कालावधीत घडला असला, तरी याबाबत २८ जानेवारी रोजी रात्री तक्रार दाखल करण्यात आली.
याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेच्या तक्रारीवरून संशयित म्हणून हिमांशू सुरेश पोटे (अमरावती) विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. सदर तरुणीची ऑक्टोबर २०१९ मध्ये हिमांशू पोटे याच्याशी ओळख झाली. वारंवार भेटी होऊ लागल्या. त्यातून प्रेमसंबंध निर्मण झाले. मात्र, त्याबाबत दोघांच्याही घरी माहीत झाल्याने तरुणीने त्याच्याशी ‘ब्रेकअप’ घेतले.
आता आपल्यात काहीही राहले नाही. त्यामुळे कॉल किंवा मॅसेज करू नको, असे त्याला बजावले. मात्र, त्यानंतरही तो कॉल व मॅसेज करून तिला त्रास देत राहिला. २३ जानेवारी रोजी तिला संदेश पाठवून त्याने तिचा पाठलागदेखील केला. तिचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देखील त्याने दिली.
दोन लाखांची मागणी
व्हिडीओ व्हायरल न करता बदनामी टाळण्यासाठी हिमांशू पोटे याने आपल्याला २ लाख रुपये मागितले. ते न दिल्याने त्याने पीडिताचे काही छायाचित्रे इन्स्टाग्रामवर टाकून बदनामी केली. तिचा विनयभंग केला. तो अनन्वित छळ सहन न झाल्याने तिने अखेर २८ जानेवारी रोजी रात्री ९ च्या आसपास नांदगाव पेठ पोलीस ठाणे गाठले. ठाणेदार प्रवीण काळे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहन चौखट यांनी तिची तक्रार नोंदवून घेतली.
मुलींनो व्हा सावध
महाविद्यालय, पिकनिक, पार्टी, पर्यटनाच्या वेळी बेसावध क्षणाचे फोटो काढले जातात. मग हे एमएमएस काही क्षणातच जगभर पसरतात. आपला कुणी फोटो काढलाय याची त्या मुलींना कल्पनाही नसते. अशावेळी काय करायचे हेसुद्धा त्यांना माहीत नसते. अशा प्रकरणाबाबत तक्रार करणे खूपच सोप्पं असते. अगदी घरबसल्या आपण तक्रार करून हा प्रकार थांबवू शकतो. अशा तक्रारी वाढतील, तशी जरब वाढेल गैरप्रकार कमी होतील.