‘तो’ चिवडा अद्याप बाजारातच
By admin | Published: September 28, 2016 12:11 AM2016-09-28T00:11:32+5:302016-09-28T00:11:32+5:30
‘मनभरी’च्या चिवड्यात आढळलेली तळलेली पाल ग्राहकांच्या दृष्टीने घातक ठरणारी होती.
ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ : ‘मनभरी’कडून ‘रिकॉल’ प्रक्रियेस विलंब
अमरावती : ‘मनभरी’च्या चिवड्यात आढळलेली तळलेली पाल ग्राहकांच्या दृष्टीने घातक ठरणारी होती. हा किळसवाणा व घातक प्रकार उघडकीस आल्यानंतर ‘मनभरी’ने तत्काळ चिवड्याचा तो माल बाजारातून ‘रिकॉल’ करायला हवा होता. मात्र, हा चिवडा अद्यापही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. तो माल ‘रिकॉल’ करण्याच्या सूचना एफडीएने ‘मनभरी’ उत्पादकांना देऊनही त्यात विलंब केला जात आहे. हा ग्राहकांच्या आरोग्याशी हेतुपुरस्सर खेळ करण्याचा प्रकार आहे.
मनभरी चिवड्याचे उत्पादन दाभा येथील ‘ओमजी नमकीन’ कारखान्यातून केले जाते. दररोज चिवड्याचे हजारो पॅक तयार करून ते बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविले जातात. हाच चिवडा विमलबाई चुडे यांनी देशपांडे प्लॉट येथील श्रीगणेश डेअरीमधून विकत घेतला होता. त्यामध्ये अख्खी तळलेली पाल आढळून आली होती. हा प्रकार 'लोकमत'ने लोकदरबारी मांडल्यानंतर अन्न व औषधी प्रशासन विभाग खडबडून जागा झाला. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेत श्री गणेश डेअरीच्या संचालकाचे बयाण नोंदविले. तसेच मनभरी ब्रँडच्या दाभा येथील ‘ओमजी नमकीन’ कारखान्यावर धाड टाकून चिवड्याचे नमुने ताब्यात घेतलेत. ते नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यात आले. याप्रकाराबाबत एफडीएकडून मनभरीच्या संचालकाला नोटीस बजावण्यात आली आहे. त्यातच बाजारपेठेत विक्री झालेला चिवडा रिकॉल करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. मनभरी चिवड्याची हजारो पाकिटे बाजारपेठेत असतानाही अद्यापपर्यंत तो माल परत बोलाविण्यात आला नाही. ही मनभरी संचालकाची मुजोर भूमिका ग्राहकांच्या जीवावर उठणारीच आहे. विषाक्त पाल तळली गेलेल्या चिवड्याचा उत्पादित माल बाजारपेठेत आजही विक्री होत आहे. ज्या ग्राहकांना याबाबत माहिती नाही ते ग्राहक आजही मनभरीचा चिवडा विश्वासानेच घेत आहेत. ही बाब ग्राहकांच्या आरोग्यावर परिणाम करणारीच ठरत आहे. मनभरी चिवड्याच्या मालासंदर्भात अद्यापही एफडीए अधिकाऱ्यांना काही सांगण्यात आले नाही. त्यामुळे एफडीए मनभरी संचालकाला मुभा तर देत नाही ना, अशी शंकाही निर्माण झाली आहे.