बेकायदेशीर बांधकाम तपासणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 10:09 PM2018-06-13T22:09:33+5:302018-06-13T22:09:48+5:30
राज्यातील अनेक महापालिका क्षेत्रांमध्ये बेकायदेशीर बांधकामाचा मुद्दा ऐरणीवर असून, त्या अनुषंगाने शहरातील बेकायदेशीर बांधकामधारकांची नाडी तपासली जाईल. शहरात अनधिकृत मालमत्तांची संपूर्ण माहिती घेऊन कारवाईची दिशा निश्चित केली जाईल, अशी माहिती नवनियुक्त महापालिका आयुक्त संजय निपाने यांनी बुधवारी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यातील अनेक महापालिका क्षेत्रांमध्ये बेकायदेशीर बांधकामाचा मुद्दा ऐरणीवर असून, त्या अनुषंगाने शहरातील बेकायदेशीर बांधकामधारकांची नाडी तपासली जाईल. शहरात अनधिकृत मालमत्तांची संपूर्ण माहिती घेऊन कारवाईची दिशा निश्चित केली जाईल, अशी माहिती नवनियुक्त महापालिका आयुक्त संजय निपाने यांनी बुधवारी दिली.
बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास मावळते आयुक्त हेमंत पवार यांचेकडून निपाने यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. ठाणे महापालिकेत उपायुक्तपदी राहिलेल्या निपाने यांची १२ जून रोजी अमरावती येथे महापालिका आयुक्त म्हणून बदली झाली. त्या आदेशान्वये ते तातडीने रुजू झालेत. त्यांनी माध्यमांशी अनौपचारिक संवाद साधला. आपण महापालिकेतील प्रशासकीय तथा अन्य संपूर्ण कामकाजाचा लेखाजोखा विभागप्रमुखांकडून घेणार असून, त्यानंतर समस्या व प्रश्नांची हाताळणी करण्याबाबत निर्णय घेऊ, व्यापारी संकुलाबाबतचा प्रश्न नियमावलीत बसून सोडविण्यासाठी लवकरच बैठक घेतली जाईल. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये २० ते २२ वर्ष प्रशासकीय कामकाजाचा अनुभव असल्याने महापालिकेचा कारभार यशस्वीरीत्या सांभाळण्याची ग्वाही त्यांनी दिली.
महापालिकेची आर्थिक परिस्थिती, अल्प मनुष्यबळ, आकृतीबंध पावसाळापूर्व नियोजन आदी महत्त्वपूर्ण बाबींचा आढावा घेतल्यानंतर त्यावर भाष्य करणे उचित ठरेल, असेही निपाने म्हणाले. मावळते आयुक्त हेमंत पवार यांचेकडून निपाने यांनी महापालिकेची एकंदरीच प्रशासकीय व राजकीय परिस्थिती जाणून घेतली.