मेळघाटातील वाघांच्या ‘कॅरिडॉर’ मार्गाची चाचपणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 11:46 AM2019-02-21T11:46:23+5:302019-02-21T11:48:01+5:30
मेळघाट व्याघ्र प्रकल्पालगतच्या वनक्षेत्रातील वाघांना ये- जा करणे सुकर व्हावे, यासाठी ‘कॅरिडॉर’ निर्मितीच्या अनुषंगाने चाचपणी सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पालगतच्या वनक्षेत्रातील वाघांना ये- जा करणे सुकर व्हावे, यासाठी ‘कॅरिडॉर’ निर्मितीच्या अनुषंगाने चाचपणी सुरू केली आहे. येत्या काळात मेळघाट व्याघ्र प्रकल्प सीमेलगतच्या राज्यांना जोडले जाईल, अशी तयारी आहे.
विदर्भात पेंच, ताडोबा, बोर, मेळघाट, नवेगाव- नागझिरा या पाच व्याघ्र प्रकल्पातील वाघांसाठी वनक्षेत्रातील रस्ते तयार करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मध्यंतरी ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या अधिक असल्यामुळे वाढीव वाघांचे नैसर्गिकरीत्या ‘कॅरिडॉर’ निर्माण करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार वनाधिकाऱ्यांनी त्या- त्या भागातील पाहणी केली. मात्र, मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वाघांसाठी ‘कॅरिडॉर’ निर्माण होण्याची चिन्हे असताना या व्याघ्र प्रकल्पास अन्य वनक्षेत्राशी जोडणे कठीण असल्याची बाब समोर आली. तथापि, नव्याने मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वाघांसाठी ‘कॅरिडॉर’ निर्मितीकरिता चाचपणी सुरू केली आहे.
आठ मार्गाचे ‘कॅरिडॉर’ निर्मितीचा प्रस्ताव
मेळघाटात वाघांचे ‘कॅरिडॉर’ निर्माण करण्यासाठी मध्यप्रदेशातील सातपुडा व्याघ्र प्रकल्प, नागपूर जिल्ह्यातील पेंच, मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील कान्हा, बैतूल वनक्षेत्र, तर जारीदामार्गे मोर्शी- वरूड वनक्षेत्र, जळगाव-जामोद ते गुजरातचे वडोदरा, मेळघाटचे अंबाबर्वा ते पोहरा- मालखेड जंगलक्षेत्र, मेळघाट ते खंडवा वनक्षेत्र धारणी असा आठ ‘कॅरिडॉर’ मार्ग वाघांचे ये-जा करण्यासाठी निर्मितीचा प्रस्ताव आहे.
वाघांना सुरक्षितपणे ये-जा करण्यासाठी कॅरिडॉर निर्मितीचा प्रस्ताव आहे. त्याअनुषंगाने चाचपणी सुरू आहे. लवकरच यासंदर्भात अंतिम निर्णय होईल.
- एम.एस. रेड्डी,
अप्पर प्रधान मुख्यवनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प