शहराच्या सीमावर्ती भागात चेकपोस्ट, सतर्क नाकाबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:11 AM2021-04-26T04:11:37+5:302021-04-26T04:11:37+5:30
अमरावती : कोरोना महामारीच्या वाढत्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ संदर्भाने कडक निर्बंध लागू केले आहे. ...
अमरावती : कोरोना महामारीच्या वाढत्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक द
चेन’ संदर्भाने कडक निर्बंध लागू केले आहे. त्याअनुषंगाने अमरावती शहर पोलीस दलातर्फे पोलीस ठाणे निहाय चोख बंदोबस्त व शहराच्या सीमावर्ती भागात चेक पोस्ट व सतर्क नाकाबंदी लावण्यात आलेली आहे.
पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या आदेशानुसार शहर आयुक्तालयातील १० पोलीस ठाणे हद्दीतील कायदा व सुवव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. सीमावर्ती भागात नाकाबंदी लावण्यात आली असून, आंतरजिल्हा व आंतरराज्य प्रवासाचे निर्बंध कडक करण्यात आले आहे. सीमेवर फिक्स पॉंईंट नेमण्यात आले असून, पोलीस अधिकारी अंमलदार व होमगार्ड्स असा एकूण २२० पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदारांचा चोख बंदोबस्त ठेवला आहे. जिल्ह्यातील एकूण १० पोलीस ठाणेनिहाय प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी तसेच १४२० पोलीस अंमलदार, २५० होमगार्ड्स असा पोलीस बंदोबस्त शहरात नेमण्यात आलेला आहे.
शहरातील नागरिकांना अत्यावश्यक कामानिमित्त आंतरराज्य किंवा आतरजिल्ह्यात जाण्याकरिता ई-पासची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी अत्यंत महत्त्वाचे (वैद्यकीय कारण, अत्यावश्यक सेवा) कामानिमित्त बाहेर जाणे गरजेचे आहे, अशा नागरिकांनी संकेतस्थळावर ई-पास प्रणालीचा वापर करावा, असे आवाहन पोलीस यंत्रणेकडून करण्यात आले आहे.
कोट
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाचे पालन करावे. कोणीही अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडणार नाही याची दक्षता घ्यावी. शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाचे पालन करावे.
- आरती सिंह, पोलीस आयुक्त