स्नेहसंमेलनाला गालबोट : विद्यार्थिनीचा सिनीअरकडून विनयभंग; अश्लील कमेंटनंतर झाला राडा
By प्रदीप भाकरे | Published: March 16, 2024 01:59 PM2024-03-16T13:59:11+5:302024-03-16T13:59:26+5:30
तरुणीच्या मित्राला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा
अमरावती : सिनिअर विद्याथ्याने एका ज्युनिअर विद्यार्थिनीवर अश्लील कमेंट केली. त्यामुळे तेथील गॅदरिंगला गालबोट लागले. त्या घटनेचा वचपा म्हणून एका तरुणाला मारहाण करण्यात आली. १४ मार्च रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका नामांकित महाविद्यालयात हा प्रकार घडला.
याप्रकरणी एका विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी १५ मार्च रोजी पहाटे अनूप कासे, दिवेश कातपुरे, विनित उमक व देवेश दाते (सर्व रा. अमरावती) या चार तरुणांविरुद्ध विनयभंग, मारहाण, धमकीचा गुन्हा दाखल केला.
येथील एका सिनिअर कालेजचे वार्षिक स्नेहसंमलन धुमधडाक्यात सुरू आहे. ते स्नेहसंमेलन पाहण्यासाठी एक ज्युनिअर विद्यार्थिनीदेखील आपल्या वर्गमैत्रिणींसह कॉलेजला पोहोचली. १४ मार्च रोजी दुपारच्या वेळी काही सिनियर विद्यार्थ्यांनी फिर्यादी विद्यार्थिनीस पाहून तिला संबोधून लज्जा निर्माण होणारे वक्तव्य केले. त्यामुळे त्या विद्यार्थिनीने सिनिअर विद्यार्थी अनूप कासे, दिवेश कातपुरे, विनित उमक व देवेश दाते यांना जाब विचारला. त्यामुळे त्यांच्यात वाद होऊन त्या मुलांनी फिर्यादी विद्यार्थिनीस शिवीगाळ केली. त्यामुळे स्नेहसंमेलनाला गालबोट लागले. माहोल पूर्णपणे बिघडला.
मित्राला मारहाण करून पसार
दरम्यान त्या विद्यार्थीनीने भावाचा मित्रास कॉलेजमध्ये बोलावुन घडलेला प्रकार त्याला सांगितला. त्याने तेथे तिची छेड काढणाऱ्या, तिला शिवीगाळ करणाऱ्या त्या टारगटांना समजावून सांगितले. त्यानंतर सर्व जण आपआपल्या रूमवर निघून गेले. त्यानंतर त्या मित्राचा फिर्यादीला फोन करून चारही आरोपींनी आपल्याला मारहाण केल्याचे सांगितले. अनूप कासे या विद्यार्थ्याचे तिच्या मित्राच्या डोक्याच्या उजवे बाजूला मारून जखमी केले व तेथून पळून गेले. फिर्यादी विद्यार्थिनीने मैत्रिणीच्या साहाय्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर उशिरा रात्री मुलीने गाडगेनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.